आकोट – संजय आठवले
दर्जाहीन कामे दिरंगाईने केल्याप्रकरणी दर्यापूर नगरपालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराने आकोट पालिकेत खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून आकोटात लक्षावधी रुपयांची कामे मिळविली असल्याने यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील रहिवासी कंत्राटदार अंकित अरुण वानखडे याने दर्यापूर पालिकेत कामे मिळविली. परंतु कामांचा दर्जा न राखता व कामांच्या मुदतीचे भान न ठेवता त्याने दिरंगाईने दर्जाहीन कामे सुरू ठेवली.
याबाबत झालेल्या तक्रारीवरून दर्यापूर पालिका प्रशासनाने त्याला तब्बल दहा पत्रे पाठवून कामांचा दर्जा व मुदतीचे भान राखण्यास सूचित केले. त्यासोबतच त्याला याबाबत दोनदा खुलासा ही मागविण्यात आला. परंतु त्याने याबाबतीत जराही गांभीर्य न दाखविल्याने अखेरीस दि. ३१.३.२०२३ रोजी दर्यापूर मुख्याधिकारी यांनी या कंत्राटदारास काळ्या यादीत समाविष्ट केलेले आहे.
दर्यापूर मुख्याधिकारी यांनी या पत्रात नमूद केले आहे कि, आपणास कळविण्यात येते की, आपण दर्यापूर नगर परिषदे अंतर्गत मुख्याधिकारी निवास बांधकामाचा कंत्राट घेतलेला आहे. आपल्या मार्फत होत असलेल्या कामामध्ये आज पावेतो आपणास वेळोवेळी कामामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने वारंवार सुचना देण्यात आल्या आहेत.
तरी सुध्दा आपण कामाच्या पध्दती मध्ये कोणतीही सुधारणा केल्याचे दिसुन येत नाही. आपण वेळोवेळी कार्यालयाचे आदेशास न जुमानता मनमानी पध्दतीने काम करुन कामाची गुणवत्ता राखण्याची तसदी न घेता स्वतःचे आर्थिक हित जोपासून काम करणे सुरु ठेवले आहे.
असे करुन आपण शासकीय निधीचा अपव्यय करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण करारनाम्या मधील अटी शर्ती चे उल्लंघन करून जाणीवपुर्वक हा गैर प्रकार केलेला आहे. त्यामुळे यापुढे आपल्या मार्फत गैरप्रकार घडू नये याकरीता सक्त ताकीदही दिलेली आहे.
तरी सुध्दा आपण मनमानी पध्दतीने चुकीचे काम करणे सुरुच ठेवल्यामुळे आपणास काम सुधारुन देणे बाबत व आपल्या गैर प्रकारा बाबत खुलासा मार्गावला होता. परंतु आपण त्यावर कोणताच लेखी खुलासा सादर केला नाही.
आपण मागील तिन महीन्यात इमारतीचे फक्त ग्राऊंड लेवल पर्यंतचे काम सुध्दा योग्य रीत्या पुर्ण केलेले नाही. आपल्या अशा असमाधान कारक कामामुळे आपणास आपले नाव काळया यादीत का टाकण्यात येऊ नये?
याबाबत लेखी खुलासा मागविण्यात आला होता. परंतु आपण विहीत मुदतीत खुलासा देखील सादर केलेला नाही. सबब नगर परिषद सर्वसाधारण सभेच्या ठरावा अन्वये आपले नांव काळया यादीत टाकण्यात आलेले आहे.
दर्यापूर पालिकेने केलेल्या या कार्यवाहीनंतर अंकित अरुण वानखडे याने आपला मोर्चा आकोट पालिकेकडे वळविला. त्याने आकोट पालिकेत निविदा भरून लक्षावधी रुपयांची कामे मिळविलेली आहेत. आकोट येथे रुजू असलेले वर्तमान मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी आल्या आल्याच नवीन पायंडा पाडला आहे.
त्यानुसार कामे मंजूर झालेल्या कंत्राटदारांकडून शंभर रुपयांचे मुद्रांकावर ‘आपणास कोणती शिक्षा झालेली नसल्याबाबत व आपणास काळ्या यादीत टाकलेले नसल्याबाबत’ प्रतिज्ञापत्र करून घेतलेले आहे.
‘असे आढळल्यास आपण भारतीय दंडविधानानुसार कार्यवाहीस पात्र राहणार असल्याचेही’ लिहून घेण्यात आलेले आहे. कामे मिळविणेकरिता अंकित वानखडे याने अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहे.
त्यामुळे या कंत्राटदाराने खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून त्याच्या या प्रतिज्ञा पत्रानुसार त्याचेवर कार्यवाही करणेबाबत मुख्याधिकारी यांचे कडे दि.२.८.२०२३ रोजी तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवर होणाऱ्या कार्यवाही कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.