नवीन सी.ओ.च्या पुढे नियमबाह्य बदल्यांच्या चौकशीचे आव्हान…शिक्षक संघटनेकडून चौकशीची मागणी
गडचिरोली:3ऑगस्ट
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत ऑनलाईन पध्दतीने बदल्या करण्याचे धोरण निश्चित असतांना, गत दोन वर्षांत या बदल्या ऑफलाइन पद्धतीने नियमांना हरताळ फासून झाल्यामुळं पेसा क्षेत्रातील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहे. हे धक्कादायक वास्तव समोर आणणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकालाच चक्क जिल्हा परिषद प्रशासनाने बक्षीस स्वरूपात निलंबनाची भेट दिली आहे.
शिक्षकांच्या बदलीत नियमबाह्यरित्या झालेल्या प्रकरणाची चौकशी करणे सोडून बदली घोटाळा समोर आणणाऱ्या शिक्षकावर कारवाई म्हणजे प्रशासनाने चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार समोर येत आहे.
नेमके काय आहे प्रकरण??
गडचिरोली जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांत ४० शिक्षकांच्या बदल्या ‘ऑफलाईन’ पद्धतीने केल्या गेल्या. शासनाने २०१७ आणि २०२१ मध्ये निर्गमित केलेल्या आदेशात समुपदेशन बदली शासन निर्णय २०१४ मधून शिक्षकांना वगळून ‘ऑनलाईन’ बदली धोरण निश्चित केले आहे. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी शासन आणि न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून तब्बल ४० शिक्षकांच्या बदल्या केल्या. यामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षकांची पदे रिक्त झाली. हा संपूर्ण प्रकार नियमबाह्य असून यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर नियमबाह्य बदल्या रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांचा घोटाळा समोर आणला म्हणून फलस्वरूप प्रशासनाने बक्षीस स्वरूपात निलंबन हातात दिले असले तरीही,या पुढे आपण अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करून लढा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया तक्रारदार व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद खांडेकर यांनी दिली आहे.
आता, नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह या नियमबाह्य बदल्यांच्या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आव्हान आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह :शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या संदर्भात आपल्याला निवेदन प्राप्त झाले असून, ह्या बदल्या वरिष्ठ स्तरावरुन शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार झालेल्या आहेत.शिक्षण विभागाची मान्यता घेऊन च बदल्या झाल्या की काय ?याची आपण माहिती घेत आहोत.पुढील चौकशी झाल्यावरच या वर स्पष्टता येईल..