पातुर – निशांत गवई
महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 मधील कलम 9 नुसार अकोला जिल्ह्यात पातुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील हा कदाचित पहिलाच गुन्हा असावा. याबाबत सविस्तर प्राप्त माहिती अशी की काही वर्षांपूर्वी पातुर येथील रहिवासी दामोदर किसन राऊत यांनी माहिती अधिकारा अन्वये तहसील कार्यालय पातुर येथे माहिती मागितली होती.
परंतु त्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य माहिती आयुक्त अमरावती खंडपीठ अमरावती यांचे समक्ष द्वितीय अपील अर्ज दाखल केला. या अर्जावरून राज्य माहिती आयुक्त अमरावती खंडपीठ अमरावती यांनी 3 डिसेंबर 2016 रोजी एक आदेश पारित केला होता. या आदेशानुसार महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 मधील कलम 9 नुसार चौकशी करण्यात आली.
या प्रकरणात तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा अव्वल कारकून तहसील कार्यालय पातुर हे दोषी आढळले. सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत. या प्रकरणात राज्य माहिती आयुक्त अमरावती खंडपीठ अमरावती यांच्या 3 डिसेंबर 2016 रोजीच्या आदेशानुसार जन माहिती अधिकारी तथा आवक-जावक लिपिक यांनी आवक जावक नोंद वही तपासून अर्जदार यांना त्यांनी मागणी केलेली माहिती आदेश मिळाल्यापासून पंधरा दिवसांमध्ये निःशुल्क द्यावी.
त्यासाठी त्यांनी तत्कालीन आवक जावक लिपिक डी.ए. खुणे यांची मदत घ्यावी. खुणे यांना सुचित करण्यात आले होते की त्यांनी तहसील कार्यालय पातुर येथे स्वतः हजर राहून मागितलेल्या माहितीचा शोध घ्यावा. सदर पत्र गहाळ झाले असल्यास महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 च्या नियमानुसार कारवाई करावी.
या आदेशानुसार तहसीलदार यांनी सोमवार 31 जुलै रोजी नायब तहसीलदार विजय खेडकर यांना या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्याबाबत सांगितल्यावरून खेडकर यांनी पातुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यामध्ये या प्रकरणात देविदास खुणे यांचेवर महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 मधील कलम 9 नुसार गुन्हा दाखल करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पातुर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पुढील कारवाई पातुर पोलीस करीत आहेत.
या प्रकरणात अपीलार्थी यांनी सात ते आठ वर्षांपासून पाठपुरावा केला. आठ वर्षानंतर उशिरा का होईना पण या प्रकरणात योग्य कारवाई होऊन आपल्याला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील अर्जदार व अपीलार्थी दामोदर राऊत यांनी व्यक्त केली.