आकोट – संजय आठवले
गोवंश जातीच्या नऊ जनावरांना कत्तल करण्याचे उद्देशाने गोठ्यात निर्दयतेने बांधून ठेवल्या प्रकरणी आकोट शहर पोलिसांना हव्या असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचा अटकपूर्व जामीन आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या दोन्ही गुन्हेगारांना अटक करण्याचा मार्ग आकोट शहर पोलिसांकरिता मोकळा झाला आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी आहे कि, आकोट शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश जवरे यांना गुप्त बातमी मिळाली. त्यावर त्यांनी तपासाकरीता दोन पंच व पोलीस ताफा यांच्या मदतीने ताहपुरा, मिल्लत नगर, आकोट येथे वरील आरोपींच्या घरासमोरील गोठ्याची तपासणी केली. जवळच आरोपी उभे होते. ते पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
परंतु तेथिल एका इसमास पोलीसांनी पकडून त्याचे नाव विचारले. त्याने अन्सारोद्दीन अनीसुद्दीन असे सांगीतले. पळून गेलेल्यांची नावे जमीलोदिन अलीमोद्दीन वय २६ वर्षे व शरीफोद्दीन अलीमोद्दीन वय ३० वर्षे दोघेही राहणार ताहपुरा मिल्लत नगर आकोट असे असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यावरून पोलीसांनी गोठयात जावून पंचा समक्ष पाहणी केली असता गोठयात एकुण ९ गोवंश जातीची जनावरे एकमेकांना नायलॉनच्या दोरीने जखडून बांधून ठेवल्याचे दिसुन आले. या जनावरांची किंमत अंदाजे १,७०,०००/- असुन या जनावरांच्या मालकी बाबत कुठल्याही खरेदीच्या पावल्या नसल्याचे व ही जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने बांधून ठेवलेली असल्याचेही त्याने सांगितले. यावरून पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
असे असताना जमीलोद्दीन व शरीफोद्दीन यांनी आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्वक जामीनाकरिता याचिका दाखल केली. त्यावेळी सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तीवाद केला कि, आकोट हे अतिशय संवेदनशील शहर असुन गोवंश जातीची जनावरे चोरी व गोवंशाचे कत्तली बाबत येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन अभिलेखावर जबरी चोरी, खंडणी, सरकारी कर्मचा-यांवर हमला, विना परवाना शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीस स्टेशन ग्रामीण आकोट येथेही गोवंश जातीची जनावरे चोरीचे आरोप आहेत. आरोपीला जामीन दिल्यास ते बाहेरगावी पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही आरोपी तपासात सहकार्य करणार नाहीत.
आरोपी वारंवार असे गुन्हे करीत आहेत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरीता वरील दोन्ही आरोपींची पोलीस कस्टडीमध्ये विचारपुस करणेकरीता दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जमानतीचा अर्ज हा नामंजुर करण्यात यावा.
सरकारी वकील अजीत देशमुख यांचे युक्तिवादानंतर आरोपीचे वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री चकोर बावीसकर यांनी आरोपींचा या प्रकरणातील अटकपूर्व जमानत अर्ज नामंजुर केला.