अमरावती – अग्निशमन विभागात सद्यस्थितीत ४७ स्थायी कर्मचारी व ७१ कंत्राटी तत्वावरील असे एकुण ११८ कर्मचारी विविध पदावर कार्यरत आहेत. सदर कर्मचारी अमरावती महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेर स्वतचा जीव धोक्यात घालुन आग विझवण्याचे तसेच इतरांचे प्राण वाचविण्याचे (रेस्क्यु ऑपरेशन) काम करतात.
त्यामुळे त्यांचेबाबत अश्या ठिकाणी कोणतीही विपरीत घटना किंवा जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब, अग्निशमन विभागातील कार्यरत सर्व स्थायी व कंत्राटी कर्मचारी यांचे विमा असणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांचे पश्चात त्यांचे कुटूंबियांना आर्थिक स्थैर्य लाभेल.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.प्रविण आष्टीकर यांनी विमा योजना राबविण्याबाबत निर्देशित केले होते. आयुक्तांनी हा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे त्याचा पाठपुरावा करुन सदर योजना अग्निशमन विभागातील कर्मचा-यांसाठी लागू केली आहे.
दी न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनी यांचेकडे कर्मचारी यांचे विमा योजनेबाबत चौकशी केली असता त्यांनी टर्म इन्शुरन्स (डीसॅबिलीटी सहीत) योजनेचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यानुसार एकुण ११८ कर्मचारी यांचे प्रति कर्मचारी रु.५ लक्ष रक्कमेकरिताचे प्रिमीयम अमरावती महानगरपालिकेतर्फे सद्यस्थितीत एका वर्षापर्यंत भरावयाचे आहेत.
तसेच भविष्यात अग्निशमन विभागात कर्मचारी यांचे संख्येत किंवा विमा प्रिमीयम रक्कमेमध्ये वाढ झाल्यास त्या वाढीस अनुसरुन सदर योजना दरवर्षी राबविण्यास मा.आयुक्त यांनी दि.१३/०६/२०२३ रोजी मंजुरात प्रदान केली आहे.
अग्निशमन विभागातील सर्व कर्मचा-यांनी ही योजना लागू केल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांचे आभार मानले आहे.