शिंदे-फडणवीस सरकार मध्ये काही दिवसांपासून वाद होतील अशी कुजबुज सुरु होती शेवटी ते चव्हाट्यावर आली. त्यातच एका वृत्तसमूहाने सर्व्हे केला आणि त्यामध्ये सर्वात चांगला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कल आल्याने भाजपच्या गोटात आणखी अस्वस्थता निर्माण झाली. सोबतच शिंदे गटाने काल दिलेल्या एका जाहिरातीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाचा भडका उडाला आहे. या जाहिरातीवरून भाजपने नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे.
यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांना ठाणे म्हणजेच महाराष्ट्र वाटत असल्याचा हल्लाबोल अनिल बोंडे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.
तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे यांच्या या टीकेला जशास तसे उत्तर दिलं आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे वाघ आहेत आणि 50 वाघांमुळेच भाजपच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे, असं जोरदार प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं आहे.
अनिल बोंडे काय म्हणाले?
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. बेडूक कितीही फुगवला तरी हत्ती होत नाही हे लक्षात ठेवा, असं म्हणत बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले होते. शिंदे गटाने सर्व्हे कुठे केला? कधी केला? असा सवाल करत ठाणे म्हणजे महाराष्ट्र आहे काय? असा चिमटाही त्यांनी काढला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. त्यांचं महाराष्ट्रभर काम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.