सांगली – ज्योती मोरे.
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन मार्फत महाराष्ट्रातील 11 रेल्वे उड्डाणपुलांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या शनिवारी ३ जूनला पुण्यात व्हर्च्युअल भूमिपूजन होत असून सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील उड्डाण पुलाचाही यात समावेश केला आहे. नितीन गडकरी यांनी सांगलीतील कार्यक्रमात या पुलाला मंजुरी दिली हाेती, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी दिली.
गाडगीळ म्हणाले की, केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम्’ या योजनेअंतर्गत मी नितीन गडकरी यांना या पुलाचा प्रस्ताव दिला होता. २६ मार्च २०२२ रोजी सांगली दौऱ्यावेळी नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण 11 उड्डाणपुलांच्या कामांत सांगलीच्या कामाचा समावेश करण्यात आला.
येत्या ३ जून रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदानावर सायंकाळी ५ वाजता या पुलाचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. सांगलीतील कामाचे भूमीपूजन व्हर्च्युअल पद्धतीने होत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाचे राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
गाडगीळ म्हणाले, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) यांच्यामार्फत हे काम होणार आहे. जुना बुधगाव रोडवरील पंचशील नगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर १२९ वर हा उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलामुळे सांगली ते माधवनगर या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. सांगलीतील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहे.