यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात असलेल्या कृष्णा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये २५ वर्षीय तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रिया रेवानंद बागेसर (२५) असे मृत तरुणीचे नाव असून ती वरोरा येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर तरुणीचा तीन चार दिवसापुर्वी खून झाला असावा. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
वणी शहरातील जैन ले-आउटच्या टोकाला असलेल्या ब्राह्मणी रोड जवळील कृष्णा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक चारमध्ये भाड्याने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी फ्लॅटचे दार बाहेरून लावलेल्या स्थितीत आढळले. पोलिसांनी दार उघडून बघितले असता, जमिनीवर तरुणीचा मृतदेह अर्धनग्न कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तर प्रथमदर्शनी मृत झालेल्या तरुणीचा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया बागेसर ही तरुणी पूर्वी वरोरा येथील एकर्जुना रोडवर असलेल्या एका वसाहतीत राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती वणीत राहायला आली होती. तिच्याच फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने तिने आत्महत्या केली की तिचा कोणी खून केला, याबाबत तर्क लावले जात आहे. फ्लॅटचे दार बाहेरून बंद असल्याने तिचा खूनच झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही घातपाताच्या दिशेनेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.