मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर दि. २४ एप्रिल रोजी अकोला येथील वकील दाम्पत्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात आरोपींवर तातडीने योग्य गुन्हे दाखल करुन, कर्तव्यात कसूर करणाऱ्या मूर्तिजापूर पोलिस स्टेशन मधिल संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसोबत घटनेचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवार २८ एप्रिल रोजी अकोला बार असोसिएशनकडून मोर्चा काढण्यात येणार आहे.
अकोला जिल्हा न्यायालय परिसरातील अकोला बार असोसिएशन कार्यालयापासून आज दुपारी ३.३० वाजता अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयपर्यत वकीलांचा पायदळ मोर्चा काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात मोर्चा पोहचल्यावर वकीलांच्या शिष्टमंडळाकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येईल. घडलेल्या घटनेत संशयित आरोपींवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी, पोलिसांकडून आरोपींना अभय देण्यात आले असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.
वकील दाम्पत्याच्या तक्रारीवरून थातुरमातुर एफ.आय.आर दाखल करणारे संबंधित पोलिस अधिकारींना तातडीने निलंबित करावे. एफ.आय.आर मध्ये दुरुस्ती करून योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मूर्तिजापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत २४ एप्रिल रोजी अकोला येथील अँड पवनेश अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी अँड.स्वपना पवनेश अग्रवाल या वकील जोडप्यांसोबत ही घटना घडली आहे. अग्रवाल दाम्पत्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेची मूर्तिजापूर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करतांना अग्रवाल दाम्पत्यांनी सांगीतल्या प्रमाणे नोंद घेण्यात आली नाही आणि भारतीय दंड विधान संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला नाही. असे अँड अग्रवाल यांनी अकोला बार असोसिएशनच्या सभेत सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
या घटनेतील संशयीतांना राजकिय पाठबळ असून प्रकरणाचा आपसात समेटासाठी पुरेपुर प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे.