मध्यप्रदेशातील शहडोल रेल्वे विभागादरम्यान सिंहपूर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. टक्कर झाल्यानंतर मालगाडीच्या पॉवरला (इंजिन) आग लागली. या अपघातात एका लोको पायलटचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. रेल्वे व्यवस्थापनाचे स्थानिक पातळीवरील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शहडोल पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. राजेश प्रसाद गुप्ता असे अपघातात प्राण गमावलेल्या लोको पायलटचे नाव आहे. पालिकेचे अग्निशमन दल आणि रेल्वेच्या बचाव पथकाने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर लोको पायलटचा मृतदेह बाहेर काढला आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले असून, एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम होत आहे. कटनीहून बिलासपूरला जाणारी संपर्क क्रांती शहडोल येथेच थांबवण्यात आली आहे, तर प्रवाशांना होणारा त्रास पाहता रेल्वेने १५ बसेसमधून शहडोल ते बिलासपूरला प्रवाशांना पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
त्याचवेळी, अपघाताची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपीएफचे जवानही घटनास्थळी रवाना झाले आहेत. या भीषण रेल्वे अपघातामुळे दोन्ही दिशांची रेल्वे वाहतूक सध्या बंद आहे. गाड्यांच्या वाहतुकीसाठी मार्ग मोकळा व्हावा यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. टक्कर इतकी वेगवान होती की त्यातील एक इंजिन उडून गेले. अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.