कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
पंचगंगा नदीत जुन्या साड्या रसायन वापरून उचगावसह परिसरात धुतल्या जात असून त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. अशा प्रदूषणात वाढ करणाऱ्या घटकांवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख राजू यादव यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
उचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांची गोदामे आहेत. या साड्या रात्री-अपरात्री रसायन वापरून नदीत धुतल्या जात आहेत. रसायनयुक्त पाण्यामुळे पंचगंगा नदी दूषित होत आहे. त्यामुळे प्रदूषणामध्ये मोठी वाढ होत आहे. याशिवाय या धुतलेल्या साड्या प्रेस करून प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये नव्या म्हणून दुकानात विक्रीसाठी ठेवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. साड्या धुणाऱ्यापासून त्या नव्या म्हणून विक्री करणाऱ्या टोळक्यांची चौकशी व्हावी. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल संबंधितावर गुन्हे दाखल होऊन कारवाई करावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके यांच्याकडे केली.
यापूर्वीही करवीरच्या तहसीलदार व उपविभागीय अधिकारी करवीर यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही, असा मुद्दा शिवसैनिकांनी उपस्थित केला. त्यावर कवितके म्हणाले की याबाबत योग्य ती माहिती घेऊन प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कळवले जाईल. नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर योग्य ती कारवाई करू. राजू सांगावकर, विक्रम चौगुले, शरद माळी, प्रफुल्ल घोरपडे, बाबुराव पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.