सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील विविध नगरपालिकांसाठी नगरविकास विभागाकडून दहा कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
याबाबत खासदार संजय काका पाटील म्हणाले की, सांगली- मिरज – कुपवाड महानगर पालिका क्षेत्र तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील वाढते शहरीकरण विचारात घेता लोकांना मूलभूत व पायाभूत गरजांची मोठी अडचण भासत आहे.
यातून दिलासा देण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करून नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील क्षेत्रासाठी नगर विकास विभागाकडून तीन कोटी दहा लाख रुपये, तासगाव नगरपालिका क्षेत्रासाठी दोन कोटी रुपये,कवठेमहांकाळ नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रासाठी दोन कोटी रुपये, पलूस नगरपालिका क्षेत्रासाठी एक कोटी रुपये,जत नगरपालिका क्षेत्रासाठी एक कोटी रुपये,खानापूर नगरपंचायतसाठी 90 लाख रुपये असा एकूण दहा कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर केला असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
या निधीमुळे जिल्ह्यातील या शहरांमध्ये रस्ते विकास, सभामंडप,अंतर्गत काँक्रिटीकरण, गटर बांधकाम कामे,कंपाऊंड, सुशोभीकरण यासह विविध विकासकामांच्या पूर्ततेनंतर शहरांच्या वैभवात निश्चितपणे भर पडेल असा आशावाद खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. या निधीच्या मंजुरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठी मदत केली असल्याची माहिती ही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.