सांगली – ज्योती मोरे
आता जे काही करायचे ते या क्षेत्रातच, परतीचे दोर कापले आहेत अशा निर्धाराने उतरूनच आम्ही लघुपटांमध्ये यश संपादन केले. खूप वेगवेगळे विषय घेऊन आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून युवक येत आहेत. भविष्यात या लघुपट आणि चित्रपट क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा दबदबा वाढेल असा विश्वास सांगली जिल्ह्यातील यशस्वी लघुपट दिग्दर्शकांनी व्यक्त केला. सांगली फिल्म सोसायटीने आयोजित केलेल्या लक्षवेधी लघुपटांच्या चित्र महोत्सवात प्रेक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
रविवारी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या या महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हाभरातून लघुपटाच्या विषयी उत्सुकता असणारे युवक युवती खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिग्दर्शक शेखर रणखांबे, उमेश मालन, यशोधन गडकरी, विक्रम शिरतोडे, प्रतीक साठे, गणेश धोत्रे, विशाल शिरतोडे या यशस्वी युवा दिग्दर्शकांचे ‘रेखा’, ‘दळण’, ‘पॉम्प्लेट’, ‘दोन चाके ४३५ दिवस’, ‘विठ्ठलाचे झाड’, ‘आइस्क्रीम’, ‘गोल्डन टॉयलेट’ ‘इन सर्च ऑफ फ्लड’ आणि ‘बूट’ असे नऊ लघुपट दाखविण्यात आले.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रा. डॉ. नंदा पाटील यांच्या हस्ते व वालचंदचे प्रभारी संचालक प्रा. उदय दबडे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक सावंत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले.
यावेळी सोसायटीचे सभासद दीपक पाटील आणि शिवराज काटकर यांनी दिग्दर्शकांची संवाद साधला. यावेळी मते मांडताना दिग्दर्शकांनी चित्रपट आणि लघुपट हे वेगळे माध्यम आहे. समाजाला जे सांगायचे आहे त्याच्या आकारमानानुसार हे ठरवावे लागते. प्रारंभिक अवस्थेतील लघुपट निर्मिती मोबाईलवर आणि संगणकाच्या साह्यानेही करता येते. बहुतांश दिग्दर्शक अशाच पद्धतीने तयार झाल्याचे सांगून आज या क्षेत्रात तंत्र वाढत असले तरी दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे यावरच त्याचे यश अवलंबून आहे.
एकमेकांच्या साह्याने आणि चांगल्या टीमद्वारे असे प्रयोग यशस्वी होऊ शकतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगलीतील दिग्दर्शकांचे लघुपट गाजत आहेत कारण त्यांचा आपल्या टीमवर आणि स्वतःच्या राबण्यावर विश्वास आहे. त्यासाठी झोकून देणारी युवा पिढी आज जिल्ह्यात आणि जवळपास दिसत आहे त्याचेच प्रतिबिंब या नऊ लघुपटांमध्ये उमटले आहे. सांगली फिल्म सोसायटी आणि वालचंद अभियांत्रिकीने हे व्यासपीठ उपलब्ध करून आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला असेही त्यांनी सांगितले.
लघुपटाना यश मिळाले तरी दिग्दर्शकांचा संघर्ष संपलेला नाही मात्र त्या संघर्षाचा बााऊ न करता आम्ही आमच्या क्षमतेवर मोठ्या संस्था आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचे लक्ष वेधून घेत आहोत. त्यामुळे सांगलीचे या क्षेत्रातील उज्वल भविष्य आम्हाला दिसते आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रम सचिव निरंजन कुलकर्णी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. दिग्दर्शकांचा परिचय सचिन ठाणेकर यांनी तर आभार अभिजीत पोरे यांनी मानले.