विद्यमान अति. जिल्हा व सत्र तथा विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी दहिहांडा पोलीस स्टेशनचे फाईलवरील गुन्हा क. ३०२/२२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७-अ मधील आरोपी इसम उत्तम देविदास तेलगोटे, वय वर्ष ५२ रा. खानापूर वेस, आकोट, जि. अकोला याने शासकीय कंत्राटदार रा. अकोला याच्याकडून रु.४०,०००/- ची लाचेची रक्कम मागितल्याबद्द्लचे प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जमानीतीचा अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी ग्रामसेवक यास अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.
येथे स्मरणीय आहे की, आकोट तालुक्यातील ग्राम जवळका येथे प्राथमिक शाळेचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारास सरपंच पती आशिष निपाणे व ग्रामसेवक उत्तम तेलगोटे यांनी 40 हजाराची लाच मागितली होती. त्यावर कंत्राटदार याने लाच प्रतिबंधक विभाग अकोला यांची कडे धाव घेतली. त्यानंतर लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाचेचे ४०००० रुपये घेताना सरपंच पती आशिष निपाणे यास रंगेहाथ अटक केली. परंतु ग्रामसेवक उत्तम देविदास तेलगोटे हा फरार होण्यात यशस्वी झाला.त्यांने दिनांक ०८.०८.२०२२ रोजी सत्र न्यायालय, आकोट येथे अटकपूर्व जामीनाचा अर्ज केला. त्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला की, सदर गुन्हयातील फरार आरोपी लोकसेवक ह्यास अटक करून त्यांचे नैसर्गिक आवाजाचा नमुना घ्यायचा आहे.तो नमूना एफएसएल अहवाल उपसंचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती येथे तपासणीकरिता पाठविणे बाकी आहे. गुन्हयाचा तपास
प्राथमिक स्तरावर असून आरोपीने लोकसेवक या नात्याने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. म्हणूनच तो अजामीनपात्र आहे. या सोबतच आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास तो त्याचे पद व प्रतिष्ठेचा गैरवापर करून फिर्यादी तथा साक्षीदारांवर दबाव तंत्राचा वापर करित त्यांना सत्य सांगण्यापासून परावृत्त करू शकतो. आपल्या देशाला भष्टाचाराची किड लागलेली असल्याने अशा आरोपीस अटकपूर्व जामीन दिल्यास समाजात वाईट संदेश जाईल. तसेच तपासाच्या अनुषंगाने आवश्यक पुरावे व कागदपत्रे हस्तगत करणे बाकी आहे.
या ग्रामसेवक आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तो या गुन्हयातील पुरावा व कागदपत्रांसोबत ढवळाढवळ करू शकतो. त्यामुळे या गुन्हयाच्या तपासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता या आरोपीची पोलीस कस्टडीत विचारपूस होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आरोपी ग्रामसेवकाचा अटकपूर्व जमानीतीचा अर्ज नामंजूर करण्यात यावा. दोन्ही पक्षांच्या युक्तिवाद ऐकून विद्यमान न्यायालयाने वरील प्रकरणात आरोपी ग्रामसेवक उत्तम तेलगोटे यांचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर केला.