रामटेक पं. स. च्या गटविकास अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन…
रामटेक तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये मागील ११ वर्षांपासून कार्यरत ४७ संगणक परिचालकांनी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्त्वात आज रामटेक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. जयसिंग जाधव आणि आपले सरकार सेवा केंद्र तालुका व्यवस्थापक श्री. अमित गायधने यांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन देऊन बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
१ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात रामटेक तालुक्यातील सर्व संगणक परिचालक सहभागी होतील, अशी माहिती संघटनेचे रामटेक तालुका अध्यक्ष तुषारकुमार शनिचरे यांनी दिली आहे.
संगणक परिचालकांच्या कामबंद आंदोलनामुळे रामटेक तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेले आपले सरकार सेवा केंद्र ऑफलाईन झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना होणार असल्यानी लवकरात लवकर मागणीची दखल सरकारने घेऊन मागणी मान्य करावी, अशी विनंती संघटनेने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
ग्रामीण भागातील जनतेला सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा पुरविणे, ग्रामपंचायतींच्या संपूर्ण जमा-खर्चाची नोंद ऑनलाईन करणे, ग्रामसभा, मासिक समांचे ऑनलाईन कामकाज, १५ व्या वित्त आयोगाचे गाव विकास आराखडे ऑफलाईन व ऑनलाईन करणे, ग्रामपंचायत सांगेल ते ऑनलाईन व ऑफलाइन काम संगणक परिचालक करतात. शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी), जनगणना, अस्मिता योजना, प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत लाखो कुटुंबांचे घरकूल सर्वेक्षण, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी कामे संगणक परिचालकाना करावी लागतात.
दरम्यान परिचालकांचा तीन – चार महिन्यांचे मानधन अडकलेले असते या दरम्यान कुटुंबांचा उदरनिर्वाह करून दोन वेळचे पोट कसे भरावे, ही मोठी बिकट समस्या त्यांच्यासमोर उभी असते. यासंदर्भात अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र वेळेवर मानधन प्राप्त होत नाही.
त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये नैराश्याची भावना निमार्ण झाली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी रामटेक तालुका संघटनेचे अध्यक्ष तुषारकुमार शनिचरे उपाध्यक्ष योगेश चव्हाण, सचिव सचिन शिवणे, संघरत्न मेंढे, प्रदीप बागडे, चंद्रशेखर बम्हणोटे, अजित किरपाण, शिरीषकुमार बावणे, निकेश रणदिवे, करण बिरणवार, गौरव नागपुरे, कैलाश दिवटे, देवीदास गाडापेले, विजय लांजेवार, राहुल शेरखुरे, दुर्योधन बघमारे, संजय मानकर, संजय गदरे, प्रणय डोंगरे, सुद्धोधन वाघमारे, अजय फाये, आशिष जुंघरे, जितेंद्र गायधने, तेजराम सव्वालाखे, पुरुषोत्तम सलामे यांच्यासह इतर संगणक परिचालक उपस्थित होते.