मुंबई – गणेश तळेकर
मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या निमित्तानं स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणींसोबतच क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. याच काळात समाजात वैचारिक क्रांती घडवत काही थोर मंडळींनी सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे.
साने गुरूजींसारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्या अवलियानं आपल्या प्रत्येक वर्तणुकीतून समाजाला धडे देण्याचं, शिकवण्याचं काम केलं आहे. आता हेच साने गुरुजी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘श्यामची आई’ या आगामी मराठी चित्रपटात हरहुन्नरी अभिनेता ओम भूतकरनं साने गुरुजींची भूमिका साकारली आहे.
अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव यांनी ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मात्या अमृता अरुण राव यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासानं पछाडलेला, तसंच बरेच पुरस्कार पटकावणाऱ्या तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेनं ‘श्यामची आई’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘श्यामची आई’ ही साने गुरुजींची कथा असल्यानं यात त्यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार?
याबाबत सर्वांनाच कुतूहल होतं. आता हे रहस्य उलगडलं आहे. नुकतंच या चित्रपटातील साने गुरुजींचा फर्स्ट लुक रिव्हील करणारं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यापूर्वी नाटकांसोबतच बऱ्याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणारा ओम भूतकर या चित्रपटात साने गुरुजींची मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘श्यामची आई’च्या निमित्तानं ओमनं पुन्हा एक नवं आव्हान स्वीकारलं आहे. यापूर्वी अँग्री यंग मॅन स्टाईल भूमिका साकारणारा ओम ‘श्यामची आई’मध्ये संयमी शिक्षकाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
एखाद्या अभिनेत्याच्या करियरमधील माईलस्टोन ठरावी अशी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओमनं खूप मेहनत घेतली आहे. साने गुरुजींसारखा लुक देण्यापासून त्यांच्यासारखा अभिनय करण्यासाठी ओमनं बराच सराव केला आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बनवण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कृष्णधवल युगात घेऊन जाणार आहे. या चित्रपटातील तीनही गाण्यांना संगीत देण्याची जबाबदारी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
ओम भूतकर एक कसलेला आणि चतुरस्र अभिनेता आहे. त्यानं यापूर्वी नेहमीच वेगवेगळ्या छटा असलेल्या व्यक्तिरेखांना अचूक न्याय दिला आहे. संवादफेकीपासून देहबोलीपर्यंत अभिनयाच्या प्रत्येक अंगावर त्यानं आपलं प्रभुत्व सिद्ध केलं आहे. याच बळावर ओमनं बऱ्याच पुरस्कारांवरही आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे.
साने गुरुजींच्या व्यक्तिरेखेचा विचार करत असताना सर्व बाजूंनी परिपूर्ण असणाऱ्या अभिनेत्याची गरज होती. या व्याख्येत ओम परफेक्ट बसत असल्यानं साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी त्याची निवड केल्याचं मत सुजय डहाकेनं व्यक्त केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळाच ओम पहायला मिळणार आहे.