महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड – भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात किन्नरांना इतरांसारखेच समान अधिकार बहाल केलेले असून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच किन्नर सेजल हिला सेतू सुविधा केंद्र आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सन्मानपूर्वक हस्तांतरीत केले. याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फित कापून प्रस्तावित होते. तथापि डॉ. इटनकर यांनी सेजलला पुढे करून तिच्याच हस्ते या सेतू सुविधा केंद्राचा शुभारंभ करून सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरू केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, डॉ. सौ. शालिनी इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, समाज कल्याण आयुक्त तेजस माळवदकर, जात पडताळणी संशोधन अधिकारी सत्येंद्र आऊलवार, लातूर प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याणचे प्रतिनिधी श्री गोडबोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.या अद्यावत सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन पार पडताच चार लाभार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे प्रातिनिधीक स्वरुपात ऑनलाईन काढून देण्यात आली.
किन्नरांसाठी असलेल्या सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी गोधने, नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने किन्नरांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठीही यापूर्वी बैठका घेऊन निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या स्मशानभूमीचाही प्रश्न आता मार्गी लागला असून यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विशेष लक्ष दिले आहे.