Monday, November 18, 2024
HomeMarathi News Today'अशी ही बनवाबनवी'मधील' हृदयी वसंत फुलताना…'या एव्हरग्रीन गाण्याला 'टकाटक २' मध्ये एलनाझ...

‘अशी ही बनवाबनवी’मधील’ हृदयी वसंत फुलताना…’या एव्हरग्रीन गाण्याला ‘टकाटक २’ मध्ये एलनाझ नौरोजीचा ग्लॅमरस्पर्श…!

मुंबई प्रतिनिधी :- गणेश तळेकर

मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे सदाबहार गीत पुन्हा नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होऊन ३४ वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनातील या गाण्याचा बहर आजही ताजातवाना आहे. आजही हे गाणं तितकंच पॅाप्युलर आहे, जितकं पूर्वी होतं. तरुणाईही प्रेमात असलेलं हे गाणं ‘टकाटक २’मध्ये नव्या रूपात पहायला मिळणार आहे.

ईराणी-जर्मन मॅाडेल एलनाझ नौरोजीच्या ग्लॅमरचा स्पर्श ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याला लाभला आहे. नुकताच ठाण्यातील विवियाना मॅालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं नव्या रूपात लाँच करण्यात आलं. निर्मात्यांनी अगोदर ९० सेकंदाचे गाणे रिलीज करून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण गाणे रिलीज करण्याचे ठरविले होते, परंतु संगीतप्रेमींच्या मागणीनुसार निर्मात्यांनी संपूर्ण गाणे आजच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संपूर्ण गाणे इश्तार म्युझिकच्या यू ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

मिलिंद कवडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टकाटक २’ या चित्रपटात ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याचा समावेश करण्यात आल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘हॅलो चार्ली’ या हिंदी चित्रपटासह ‘सॅक्रेड गेम्स’, ‘अभय’, ‘हुत्झपा’ या वेब सिरीजमध्ये एलनाझ नौरोजीनं अभिनय केला आहे. ‘ओम’ चित्रपटातील एलनाझचं ‘काला शा काला…’ हे गाणंही चांगलंच गाजलं होतं. याखेरीज ‘जुगजुग जिओ’ या हिंदी चित्रपटातही तिचं एक गाणं होतं. आता एलनाझच्या ग्लॅमरचा तडका मराठी गाण्याला लाभल्याचं रसिकांना पहायला मिळणार आहे. ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याच्या तालावर एलनाझ मराठी रसिकांना ठेका धरायला लावणार आहे.

‘टकाटक २’मध्ये मुख्य भूमिका साकारणारे कलाकार प्रथमेश परब, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, कोमल बोडखे या गाण्यात एलनाझच्या जोडीला झळकणार आहेत. गीतकार जय अत्रे यांनी या गाण्याचे पुर्नलेखन केलं असून, गायिका श्रुती राणेच्या आवाजात संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिलं आहे. राहुल संजीर यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं आजही अबालवृद्धांमध्ये पॅाप्युलर आहे. ‘टकाटक २’च्या माध्यमातून रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ आणि पर्पल बुल एंटरटेनमेंटने जुन्या गाजलेल्या गाण्यांचा नवीन चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वापर करण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आहे, त्यामुळे भविष्यात आणखी काही नवीन चित्रपट हा ट्रेंड वापरून नवीन चित्रपटांना जुन्या गाण्यांच्या सौंदर्याची जोड नक्कीच देतील.

‘टकाटक २’च्या निमित्तानं मराठीत काम करण्याची संधी मिळाल्यानं खूप आनंदी असल्याची भावना एलनाझनं व्यक्त केली आहे. हिंदी चित्रपटांनंतर मराठीतील गाजलेल्या गाण्याच्या पुर्ननिर्मितीत आपणही सहभागी असल्याचं समाधान लाभल्याचं मतही एलनाझनं व्यक्त केलं आहे. ह्या गाण्यासोबत इतकी मोठमोठी दिग्गज नावे जोडलेली पाहून आधी मी आपले दोन्ही कान धरले आणि ओरिजनल चालीला व गाण्यामागच्या विचारांना जरा सुद्धा धक्का लागू नये ह्याची पूर्णपणे खबर मी आणि गीतकार जय अत्रे यानी घेतली. मॉडर्न साऊंडचा वापर केला, एका नवीन चालीने केलेली सुरूवात पुढे ओरिजनल चालीला जोडली आणि जे माझ्याकडनं घडलं ते दिग्दर्शक मिलिंद कवडे सरांना, पर्पल बुल आणि रिलायन्सच्या टीमला खूप आवडलं.

तेव्हा हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही असा आत्मविश्वास माझ्यात आणि गीतकार जयमध्ये आल्याचे यावेळी संगीतकार वरुण लिखतेने स्पष्ट केले. ‘टकाटक’चे टायटल अगोदर ‘हृदयी वसंत फुलताना’ असं ठेवण्यात आलं होतं, पण टायटल उपलब्ध नसल्याने टकाटक ठेवण्यात आले. ‘टकाटक २’च्या निमित्ताने रिलायन्सशी चर्चा करताना त्यांना जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी व्हीनस म्युझिकशी संपर्क साधून ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याचे रुपांतरण करण्याचे अधिकार मिळवले. ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याने ‘टकाटक २’मध्ये नवचैतन्य फुंकण्याचं काम केलं असून, जुन्या पिढीतील रसिकांच्या हृदयावर राज्य करणारं हे गाणं तरुणाईही नक्कीच डोक्यावर घेईल असे दिग्दर्शक मिलिंद कवडे म्हणाले.

‘टकाटक २’ निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: