सांगली – ज्योती मोरे
कोरोना काळातील माफ करण्यात आलेली फी परत मिळावी यासाठी, आज सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत महाविद्यालय दणाणून सोडले.मागण्या मान्य होईपर्यंत न हटण्याचा निर्णयामुळे महाविद्यालय प्रशासनाने मागण्या मान्य करून, सर्व विद्यार्थ्यांचे १ कोटी ७३ लाख ५५ हजार महाविद्यालय परत करणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे २ वर्ष महाविद्यालय हे बंद होते. महाविद्यालयातील कुठल्याही सोयी सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता न आल्याने तत्कालीन सरकारने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये २५% कपात करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शुल्कामध्ये १६,२५० रुपये सवलत देणे हे क्रमप्राप्त होते परंतु वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही सवलत विद्यार्थ्यांना दिली नाही.
याविषयात अभाविप ने वारंवार महाविद्यालयाला निवेदन दिले, डेप्युटी डायरेक्टर यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु महाविद्यालयाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अभाविपने आज महाविद्यालय बंद आंदोलन केले. यावेळी महाविद्यालयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे साडेतीन तास विद्यार्थ्यांनी आंदोलन केले व डेप्युटी डायरेक्टर महाविद्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीवर विद्यार्थ्यांकडून दगड ठेऊन निषेध करण्यात आला,
दिनांक ३१ मार्च पर्यंत खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे १६,२५०/- प्रत्येकी, इतर मागास वर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे १०,०००/- (एकूण शुल्काच्या २५%) एवढे शुल्क विद्यार्थ्यांना परत करून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अभाविप ने आंदोलन मागे घेतले. एकूण १५६० विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती आणि जमाती चे विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना १ कोटी ७३ लाख ५५ हजार महाविद्यालय परत करणार आहे.
महाविद्यालय बंदला सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी अभाविप चे आभार मानले. हे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी देखील शेवटच्या विद्यार्थ्याला शासन निर्णयानुसार शुल्क परतावा मिळेपर्यंत अभाविप पाठपुरावा करत राहील असे मत अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी व सांगली महानगर मंत्री उत्तरा पुजारी यांनी व्यक्त केले आहे.