Saturday, November 23, 2024
Homeराजकीयग्रामपंचायत जऊळका सरपंचावर अविश्वास दाखल…१६ फेब्रुवारी रोजी सुनावणी… अविश्वास आणणारे अज्ञात स्थळी...

ग्रामपंचायत जऊळका सरपंचावर अविश्वास दाखल…१६ फेब्रुवारी रोजी सुनावणी… अविश्वास आणणारे अज्ञात स्थळी रवाना…

आकोट – संजय आठवले

ग्रामपंचायत सरपंचावर त्याच्या नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षांचे आत अविश्वास आणता येणार नाही, ह्या शासन निर्णयामुळे गत दीड वर्षापासून अविश्वास दाखल करण्याकरिता प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत जऊळका सदस्यांनी सरपंचाचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांच्यावर अविश्वास दाखल केला आहे. या संदर्भात दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली असून अविश्वास दाखल करणारे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.

दोन वर्षांपूर्वी आकोट तालुक्यातील ग्रामपंचायत जऊळका सरपंच पदी सौ. उषा सतीश काठोळे ह्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी उपसरपंच व पाच सहकारी सदस्य यांचेशी असभ्य वर्तन करून मनमानी कारभार सुरू केल्याने सर्वच सदस्यांमध्ये त्यांचेबाबत असंतोष निर्माण झाला.

परंतु सरपंचाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याखेरीज त्यांचेवर अविश्वास आणता येणार नाही, ह्या शासन निर्णयामुळे या सर्व सदस्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. परंतु सरपंचाचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच या ईर्षेने सर्व सदस्य योग्य संधीची प्रतीक्षा करीत होते. अखेर दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सरपंच सौ. उषा काठोळे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आणि दुसऱ्याच दिवशी सरपंच वगळता उर्वरित सहाही सदस्यांनी सरपंचावर अविश्वास दाखल केला.

सदस्यांना विश्वासात न घेणे, त्यांचेशी असभ्य वर्तन करणे. त्यांचे पती सतीश काठोळे यांनी ग्रामपंचायत कामकाजात ढवळाढवळ करणे, मासिक सभेचे प्रोसिडींग बुक घरी नेणे असे आरोप उपसरपंच दीपक गजानन शेटे, सदस्य सुजित पुरुषोत्तम दांदळे, सौ. छाया प्रवीण अंभोरे, सौ. शिला जगदेव अवचार, संजय देविदास इंगळे व सौ. सुप्रिया निलेश धांडे यांनी ह्या अविश्वास प्रस्तावात केले आहेत.

हा अविश्वास प्रस्ताव आकोट तहसीलदार निलेश मडके आणि परीविक्षाधिन तहसीलदार तथा प्रभारी निवासी नायब तहसीलदार अक्षय रासने यांचे समक्ष दाखल करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सर्व बाबींची पडताळणी करून यासंदर्भात सुनावणी करिता १६ फेब्रुवारी २०२३ हा दिवस मुक्रर केला आहे. दरम्यान आपल्या सहकाऱ्यांवर कोणताही दबाव येऊ नये, याकरिता हे सहाही सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: