अमरावती
राज्यघटनेत समाविष्ट असलेली स्त्री-पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वधर्मसमभाव यासारखी मूल्ये रुजविण्यासाठी वारकरी संप्रदायाने आधीपासूनच अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पंढरपुरच्या वारीत नवराही बायकोच्या पाया पडतो. संत जनाबाईंनी पुरुषप्रधान काळातही खंबीरपणा दाखवून भर चौकात कीर्तन करून दाखविले. स्त्री-पुरुष, लहान मोठा, उच्च नीच्च असा भेद नसल्याने वारकरी संप्रदाय हा संविधानाप्रमाणे सर्वांना सामावून घेणारा असल्याचे प्रतिपादन हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
जाणीव प्रतिष्ठानच्यावतीने अभियंता भवन येथे नुकताच रिंगणच्या मुक्ताबाई विशेषांकाचे प्रकाशन व ‘राज्यघटना आणि संत परंपरेचा सहसंबंध’ या विषयावर श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे होते, प्रमुख पाहुणे म्हणून रिंगणचे संपादक सचिन परब, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती चौधरी- देशमुख उपस्थित होत्या.
संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिंगणच्या मुक्ताबाई या विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले.
पुढे बोलताना शामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले की,संतांनी नेहमीच कर्मकांडावर प्रहार केले आहे. पूर्वी पाऊस पाडण्यासाठी यज्ञ केले जायचे; मात्र यज्ञ केल्याने कोणताही पाऊस पडत नाही. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी यज्ञासारख्या कर्मकांडातून मानवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ‘हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असे सांगून त्यांनी कोणतेही कर्मकांड न करता हरिभजन या साध्या व सरळ मार्गानेही पुण्य मिळविता येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रिंगणचे संपादक सचिन परब म्हणाले की, समाजात अस्पृश्यता नाकारून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण संतांनी दिली. मध्यंतरीच्या काळात संतांच्या विचारांचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळेच आम्ही रिंगणच्या माध्यमातून विविध संतांच्या पाऊलवाटा आणि मूड शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
अध्यक्ष मार्गदर्शन करताना ज्येष्ठ शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे म्हणाले की, वैकुंठात जाण्याचा कोणताही मोह संत तुकाराम, संत नामदेव यांनी दाखवला नाही. वारकरी परंपरेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांचेही योगदान आहे. मुंबईचे ब्रिटिश काळातील गव्हर्नर ग्रँड अलेक्झांडर यांनी संत तुकारामांचे ग्रंथ सरकारी खर्चाने कमी किमतीत लोकांना उपलब्ध करून दिले. शेख मोहम्मद यांच्यासारखे अनेक मुस्लिम संत वारकरी संप्रदायात आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेने पहिल्याच दिवशी भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
शिक्षकी पेशात असताना सुद्धा आपल्या रांगोळी कलेच्या माध्यमातून मुक्ताबाईची जिवंत रांगोळी साकारणारे उमेश उदापुरे यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जयंत सोनोने यांनी केले. तर आभार अमोल शेंडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजनासाठी जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौधरी प्रदीप पाटील विद्या लाहे आशिष कडू अॅड आनंद गाडगे, सोनाली देवबाले, आकाश देशमुख डॉ पराग सावरकर, रवींद्र मोरे आदींनी सहकार्य केले.