महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांचा कसबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल.
मुंबई – पुण्यातील कसबा व चिंचवड मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रितपणे लढवत आहे. या दोन्ही जागांवरही महाविकास आघाडीचेच उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन कसबा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी दाखल केला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, मोहन जोशी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मंडळी इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा लोकांचा कामापुरता वापर करून घेते. गरज संपली की मग भाजपा त्या लोकांना विसरतो. आजही भाजपा लोकमान्य टिळक, मुक्ता टिळक व टिळक कुटुंबाला विसरली. भाजपाला जनता कंटाळली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपाला साफ नाकारले, भाजपाचा दारूण पराभव झाला. भाजपाने सत्तेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. जनता त्यांना मतदानाने उत्तर देणार असून कसबा व चिंचवडच्या जागेवरही महाविकास आघाडीच विजयी होईल.
कसबा व चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा भाजपाने व्यक्त केली आहे यावर बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, कोल्हापूर, देगलुर, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीवेळी भाजपाने अशी भूमिका घेतली नाही, भाजपाच्या सोईने निर्मण होणार नाही. विधानसभेची ही पोटनिवडणुक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र मिळून लढवत आहेत. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित विजयी होतील असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.