कालपासून अमरावती पदवीधर निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली मात्र दुसरा दिवस उजाडला तरी निकाल लागला नसल्याने मतदारांची उत्सुकता वाढली आहे. तर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत आहे. काल दुपारी धीरज लिंगाडे हे 2 हजार मते घेऊन आघाडीवर आहेत. एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर होते. सध्या पसंती क्रमांक दोनची मोजणी सुरू आहे. त्यामुळे या मतमोजणीत कुणाचा विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अमरावती पदवीधरमध्येही काँग्रेसचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांच्यात चुरशीची लढत सुरूच आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणी अखेर काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे हे २ हजार ३१३ मतांनी आघाडीवर असून, त्यांना ४३ हजार ३४० मते, तर डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते मिळाली. तर विजयासाठी ४७ हजार १०१ मतांचा कोटा निश्चित केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना सुरू आहे.
निकाल का रखडला?
भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. तब्बल 8 हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेर मतमोजणी सुरू केल्याने हा निकाल रखडला आहे.
फेर मतमोजणी अंगाशी
रणजित पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. अवैध मते बाद झाल्यास आपला विजय होईल, असा पाटील यांचा कयास होता. अवैध मते धीरज लिंगाडे यांना पडल्याचा पाटील यांचा अंदाज होता. पण त्यांचा हा अंदाज फोल ठरला आहे. 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली आहेत.
मात्र, रणजित पाटील यांना या 8 हजार अवैध मतांपैकी 4500 ते 5000 अवैध मते मिळाली. त्यामुळे पाटील यांची ही अवैध मते बाद करण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांचचं नुकसान झालं आहे. फेर मतमोजणी करण्याची मागणी पाटील यांच्या अंगलट आल्याचं फेर मतमोजणीतून दिसून आलं आहे.