जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रा आज पुन्हा सुरू झाली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अवंतीपोरा येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. आज पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती याही यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथून आपली ‘भारत जोडो यात्रा’ पुन्हा सुरू केली. एका दिवसापूर्वी, पक्षाने सुरक्षेमध्ये त्रुटी ठेवल्याचा आरोप केल्यानंतर अनंतनाग जिल्ह्यात यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती. केंद्रशासित प्रदेशात पोलिसांनी केलेली सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला होता.
आरोपांवर, जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने म्हटले होते की अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमल्यामुळे सुरक्षा संसाधनांवर दबाव वाढला आणि असे दिसून आले की राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली गेली नाही. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती या शनिवारी अवंतीपोरा येथे ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान राहुलसोबत पायी चालताना दिसल्या. या यात्रेत मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रियांका गांधी वाड्रा यांचाही समावेश होऊ शकतो
काश्मीरमध्ये राहुल यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा याही यात्रेत सहभागी होऊ शकतात. यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी यात्रेच्या सुरुवातीच्या ठिकाणाकडे जाणारे सर्व रस्ते सील केले होते. केवळ अधिकृत वाहने आणि पत्रकारांना कार्यक्रमस्थळी जाण्याची परवानगी होती. राहुलच्या आजूबाजूला त्रिस्तरीय सुरक्षा गराडा आहे.