IND vs NZ : टी-20 चा नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादव न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. यावेळेस तो नव्या भूमिकेत असेल. सूर्याला बढती देण्यात आली असून आता तो उपकर्णधाराचीही भूमिका बजावणार आहे. सूर्या हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा स्फोटक फलंदाज आहे आणि शुक्रवारी जेव्हा तो रांचीच्या मैदानावर उतरेल तेव्हा अनेक विक्रम त्याच्या लक्ष्यावर असतील. यातील एक विक्रम माजी कर्णधार एमएस धोनीचाही असेल, जो तो अवघ्या 40 धावा करून मोडेल. एमएस धोनी गुरुवारी अचानक टीम इंडियाच्या रांचीमधील ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. येथे त्याने कर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंची भेट घेतली. उद्याचा सामना पाहण्यासाठी धोनीही जाणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत धोनीला स्वत:चाच विक्रम मोडताना पाहण्याची खास संधी असेल.
धोनीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1617 धावा केल्यात
सूर्यकुमार यादवने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 45 सामन्यांच्या 43 डावांमध्ये 1578 धावा केल्या आहेत, तर एमएस धोनीने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 98 सामन्यांच्या 85 डावांमध्ये 1617 धावा केल्या आहेत. जर सूर्याने पहिल्याच सामन्यात ४० धावांचा टप्पा गाठला तर तो एमएस धोनीला मागे टाकेल. यासोबतच तो टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज सुरेश रैनाचा विक्रमही मोडेल. रैनाने 78 सामन्यांच्या 66 डावात 1605 धावा केल्या. सूर्या 28 धावा करून रैनाचा विक्रमही मोडू शकतो. सूर्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता तो शिखर धवनला मागे टाकू शकतो, असेही म्हणता येईल. धवनचा विक्रम मोडण्यासाठी सूर्याला 181 धावा कराव्या लागतील. सूर्याने 40 धावा केल्याबरोबरच तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज बनणार आहे.
विराट कोहली अव्वल स्थानावर आहे
या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात भारताचे दोन फलंदाज अव्वल स्थानावर आहेत. पहिल्या क्रमांकावर विराट कोहलीने 115 सामन्यांच्या 107 डावांमध्ये 4008 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने 148 सामन्यांच्या 140 डावांमध्ये 3853 धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये केएल राहुल तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 72 सामन्यांच्या 68 डावांमध्ये 2265 धावा केल्या आहेत. हे तिन्ही खेळाडू टी-20 मालिकेचा भाग नसले तरी सूर्या हा विक्रम मोडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.