नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत न.प. नांदुरा हद्दीतील केलेल्या बोगस कामांची चौकशी होवून संबंधीत कंत्राटदारावर काळ्या यादीत समाविष्ट दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होवून अटक होणेबाबत.
मागासवर्गीय वस्तीतील खालील सह्या करणारे नागरीक.
नगर परिषद नांदुरा हद्दीतील वार्ड क्र. २० मधील मागासवर्गीय नागरीक सन २०१५-१६ च्या दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत केलेल्या बांधकामीत प्रकरणात वारंवार नगर परिषद नांदुरा व आपल्या कार्यालयास प्रलंबित दलित वस्तीतील कामे पूर्ण करणेबाबत दया, याचना करीत आलेलो होतो व आहोत. परंतु आपल्या कार्यालयाकडून व नगर परिषद नांदुरा यांचेकडून सदरहू निधीचा करण्यात आलेला गैरवापर व निकृष्ट दर्जाचे केलेले बांधकाम याकामी कोणतीही न्यायदखल व उचित कार्यवाही आजपर्यंत केलेली नव्हती व नाही.
त्याबाबत आपल्या कार्यालयात मागासवर्गीय नागरिकांनी बेमुदत आमरण उपोषण सुध्दा केलेले होते. त्यात आपल्या कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही करून संबंधीतांबर पोलीस फौजदारी संहितेनुसार प्रकरण समाविष्ट करण्याबाबत आम्हास उपोषणादरम्यान कळविले होते. असे असतांना सुध्दा आपल्या कार्यालयाकडून व नगर परिषद नांदुरा यांच्याकडून सदरहू प्रकरणात नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीची होणारी लयलुट व अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारास पाठीशी घालण्याचा आपला असलेला एक कलमी कार्यक्रम चालूच आहे.
सदरहू वार्ड क्र. २० मधील निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले सामाजिक सभागृहाचे बांधकाम, सदरहू सामाजिक सभागृहास प्रदान करण्यात आलेल्या सभोवतालच्या सुशोभीकरणाच्या सुविधा व महावितरण मार्फत पुरविण्यात आलेला विद्युत पुरवठा याबाबत आपल्या व संबंधीत नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही योग्य ती नियमित सुविधा नागरी दलित वस्तीच्या नागरीकांना दिलेली नव्हती व नाही.
आपणास वरील या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, येत्या सात दिवसांत संबंधीत सामाजिक सभागृहाचे बांधकाम कायमस्वरुपी निष्कासीत करून व सदरहू कंत्राटदार, सहकंत्राटदार यांची बांधकाम नोंदणी काळ्या यादीत समाविष्ट करुन संबंधीत मुख्याधिकारी व तत्कालिन मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर द.अ. प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करा.
दलित वस्तीच्या निधीचा अपहार करणेकामी यांच्याकडून सदर निधी व्याजासह वसुल करा अन्यथा असे न झाल्यास नगर परिषद कार्यालय व आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात भिम सैनिकांच्या द्वारे उग्र आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या सर्व परिणामास आपण व्यक्तीशः जबाबदार राहाल. याची नोंद घ्यावी.