सांगली – ज्योती मोरे
शाहीर महर्षी र द दीक्षित यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शाहीर परिषद सांगली जिल्हा व शाहीर महर्षी रद्द दीक्षित प्रतिष्ठान चिंचणी तालुका तासगाव यांच्या वतीने चिंचणी येथील दत्त मंदिरात शाहिरी क्षेत्रातील कार्यासाठी शाहीर रंगराव धोंडीराम पाटील, कोल्हापूर यांना शाहीर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवाय चिंचणी येथील हुशार,गरजू विद्यार्थ्यांना मातोश्री कै. सौ.कुमुदिनी दीक्षित यांच्या स्मरणार्थ प्रोत्साहन पुरस्कारांचे वितरणही केले जाणार आहे.याच दिवशी रात्री नऊ वाजता “ही रात्र शाहिरांची” हा पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत शाहीर हजेरी लावणार असल्याची माहिती, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे विभागीय अध्यक्ष शाहीर रामचंद्र जाधव यांनी दिली.
चिंचणी गावचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव भाऊ माळी यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,महाराष्ट्र शाहीर परिषद पुणेचे अध्यक्ष जनशाहीर दादा पासलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे नियोजन शाहीर महर्षी र.द.दीक्षित प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिनाथ दीक्षित,महाराष्ट्र शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर अनंत कुमार साळुंखे,उपाध्यक्ष शाहीर बजरंग आंबी ,विभागीय अध्यक्ष शाहीर रामचंद्र जाधव,प्रतिष्ठानचे कार्यवाह दीपक जाधव, शिवस्वराज्य गणेशोत्सव मित्र मंडळ व प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त करत आहेत.