- रेपनपल्ली उपपोलिस ठाण्याचा पुढाकार
- अहेरी -जिल्हा पोलिस दलाचे जवान नक्षली चळवळीशी दोन हात करीत असतांना विविध सामाजिक उपक्रम राबवित आले आहेत. असाच उपक्रम अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली उपपोलिस ठाण्याने राबविल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. अहेरी-सिरोंचा 353 या राष्ट्रीय महामार्ग हा दुरावस्थेमुळे वाहतूकदारांसाठी मृत्यूचा सापळाच ठरत आलेला आहे. वाहतूकदारांची ही समस्या लक्षात घेत रेपनपल्ली पोलिसांनी पुढाकार घेत लोकहसभागतून सदर रस्त्याची डागडुजी केली. रेपनपल्ली पोलिसांच्या या पुढाकाराबद्दल ग्रामस्थांसह वाहतूकदारांकडून विशेष कौतूक होत आहे.
- अहेरी-सिरोंचा या 353 राष्ट्रीय महामार्गाची दैनावस्था झाली आहे. या मार्गाची अक्षरश: चाळण झाली असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे सातत्याने अपघातास आमंत्रण देत आले आहेत. त्यामुळे सदर मार्ग मृत्यूचा सापळा म्हणून जिल्हाभरात गणल्या जातो. दरम्यान याच मार्गावर येत असलेल्या रेपनपल्ली मार्गावर पडलेले खड्डे धोकादायक ठरत होते. मात्र संबंधित विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने वाहतूकदारांसह रेपनपल्लीवासीयांना यामुळे त्रस्त झाले होते.
वाहतूकदारांची ही समस्या लक्षात घेता पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरी अप्पर पोलिस अधीक्षक अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी क्षिरसागर यांच्या नेतृत्वात रेपनपल्ली उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पांडूरंग हाके, पोलिस उपनिरीक्षक जी. डी. खटिंग यांनी पुढाकार घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचेसह लोकसहभागातून खड्ड्यात मुरुम टाकीत रस्त्याची डागडूजी केली.
रेपनपल्ली पोलिस अधिका-यांच्या नेतृत्वात येथील जवानांनी लोकांच्या सहकार्याने मार्गावरील खड्डे बुजवित सदर रस्ता वाहतूकीस अधिक सुकर केला. रेपनल्ली पोलिसांच्या या पुढाकाराबद्दल रेपनपल्लीवासीयांसह वाहतूकदारांनी आनंद व्यक्त केला आहे.