Monday, December 23, 2024
Homeराज्यती आमच्याकडून अनावधानाने झालेली तांत्रिक चूक…विधिमंडळाची दिशाभूल केल्याचा आरोप बिनबुडाचा…खाणधारकाचा खुलासा…

ती आमच्याकडून अनावधानाने झालेली तांत्रिक चूक…विधिमंडळाची दिशाभूल केल्याचा आरोप बिनबुडाचा…खाणधारकाचा खुलासा…

आकोट- संजय आठवले

आकोट शहरातून गौण खनिजाची वाहतूक करताना पकडलेल्या व पोलिसात जमा केलेल्या वाहन क्रमांकाच्या ५ वेळा ईटीपी पासेस बनवून त्याआधारे गौण खनिजाची वाहतूक करण्यात आलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आलेली असल्याने विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नांना अगदी योग्य तीच उत्तरे देण्यात आली आहेत. त्यामुळे ह्या उत्तरांद्वारे विधिमंडळाची दिशाभूल केल्याचा आरोप बिनगबूडाचा असल्याचा खुलासा खाणधारक महेंद्र तरडेजा यांनी केला आहे.

आपल्या खुलाशात तरडेजा यांनी म्हटले आहे की, गौण खनिज विकत घेण्याकरिता हे वाहन आपल्या प्रेरणा स्टोन क्रशरवर आले होते. मात्र त्याची ईटीपी तयार करताना ते वाहन अचानक परत गेले. आणि त्याने दुसऱ्या ठिकाणाहून गौण खनिज खरेदी केले. त्यादरम्यान आपल्या खाणीत ह्या वाहनाच्या सिरीजची अन्य काही वाहने उभी असल्याने ईटीपी तयार करणाऱ्या इसमाने अनावधानाने या वाहनाचा ईटीपी पास तयार केला. परंतु त्याद्वारे शासनास फसविण्याचा अथवा गौण खनिज चोरी करण्याचा मुळीच हेतू नव्हता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ह्या वाहन क्रमांकाच्या बनविलेल्या ईटीपी पासेसच्या आधारे वहन करण्यात आलेल्या गौण खनिजाचा शासकीय भरणा आधीच केलेला होता. त्यामुळे या वहनाद्वारे शासनाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आणि तसे करण्याचा आमचा मानसही नव्हता. परंतु त्याच वाहन क्रमांकाचे ईटीपी पासेस तयार करण्याची चूक अनावधानाने झाली आहे.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आलेली आहे. चौकशी अंती ही तांत्रिक चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. या चुकीमुळे शासनाचे कोणतेही नुकसान झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे या संदर्भात कोणतीही दंडनीय कार्यवाही झालेली नाही. याप्रकरणी चार आमदारांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे दिली गेली आहेत. त्याद्वारे विधिमंडळाची कोणतीही दिशाभूल झालेली नाही. त्यामुळे या संदर्भात विधिमंडळाची दिशाभूल केल्याचा आरोप हा बिनबुडाचा असल्याचे महेंद्र तरडेजा यांनी सांगितले. आपल्या कथनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी चौकशीतील दस्तावेजही प्रस्तुत केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: