मुंबई – महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील विमानतळाला “बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग” असे नाव देण्याच्या ठरावास आज विधान परिषदेत मंजुरी मिळाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदर शासकीय ठराव मांडला. या विमानतळ परिसरात बॅ.नाथ पै यांचे जीवन चरित्र पुढील पिढीला कळावे यासाठी विस्तृत माहितीचे शिलालेख तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक बांधून त्यांना गौरविण्यात येईल, असे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
या विमानतळास वायुयान नियमानुसार सिंधुदुर्ग विमानतळ, सिंधुदुर्ग याकरिता आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यास विमानतळ लायसन सार्वजनिक हितासाठी वापरण्यासाठी देण्यात आले होते. सिंधुदुर्ग विमानतळाला “बॅ.नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग करण्याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. या ठरावाच्या वेळी विधान परिषद सदस्य जयंत पाटील तसेच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही सूचना मांडली होती.