Saturday, November 23, 2024
Homeराज्यआदिवासींच्या अनुदानावरील विविध योजनांसाठी ३० जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत...

आदिवासींच्या अनुदानावरील विविध योजनांसाठी ३० जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत…

नांदेड – महेंद्र गायकवाड

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2022-23 अंतर्गत मंजूर योजनाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून पुढील तपशिलातील नमूद योजनाचे अर्ज नि:शुल्क मागविण्यात येत आहेत. या योजनांचे अर्ज किनवट प्रकल्पातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या ठिकाणी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी या कार्यालयातील सेवायोजन कक्ष येथे दूरध्वनी क्रमांक 02469-222015 वर संपर्क साधावा. योजनेचे परिपुर्ण अर्ज दिनांक 30 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

गट- अ मध्ये आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर तुषार / ठिबक संच खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे. आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर टिनपत्रे खरेदी करण्यासाठी, आदिम जमातीच्या कोलाम लार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर टिनपत्रे खरेदी करण्यासाठी, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर तारकुंपन खरेदी करण्यासाठी, आदिवासी युवक-युवतींना वैयक्तिक रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी 85 टक्के अनुदानावर संगणक व प्रिंटर संच खरेदी करण्याकरीता अर्थसहाय्य करणे.

गट- ब मध्ये आदिवासी युवक-युवतींना गट क पदे स्पर्धात्मक पूर्वतयारी निवासी प्रशिक्षण देणे. आदिवासी युवक-युवतींना डीएड / बीएड टीईटी परिक्षेचे निवासी प्रशिक्षण देणे. आदिवासी युवक-युवतींना रुग्णसहायक-सहायीका अभ्यासक्रम निवासी प्रशिक्षण देणे. गट-क मध्ये शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्याकरीता एकुण 6 योजनेस मंजुरात आहेत. याकरीता या प्रकल्पाअंतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापकांनी अर्ज सादर करावेत.

या योजनेकरीता शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र / अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करतांना प्रथम अपंग, विधवा, परितक्त्या, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच प्रशिक्षण योजनेकरीता स्वयंसेवी / सेवाभावी संस्थानी गट-ब व गट-क चे प्रशिक्षणाचे योजनेकरीता या कार्यालय स्तरावर विहित नमुन्यात प्रस्ताव / अर्ज सादर करावेत. याकरीता या कार्यालयाचे सेवायोजन शाखेशी संपर्क साधावा, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: