मुंबई प्रतिनिधि- गणेश तळेकर
रक्षाबंधन् या दिवशी भायखळाच्या ‘साई एनजीओ’ मध्येही रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात आला. आता तुम्ही म्हणाल, ‘रक्षाबंधन’ यात वेगळेपण ते काय? सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात ‘साई’ या संस्थेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम सामाजिक अन्याय, एड्स आणि मुलांसाठी शिक्षणासाठी लढणाऱ्या गरीब आणि वंचित देहविक्रय करणाऱ्या महिला आणि कॅन्सर पीडित मुलांच्या मातांबरोबर १०ऑग्स्ट २०२२ ला आयोजित केला होता. या कार्यक्रमास बॉलिवुड अभिनेता जे. ब्रॅंडन हिल, अभिनेता विजय कदम यांची विशेष उपस्थिती होती.
आज ४६ वर्षांची असणारी गीता तिच्या वयाच्या १६ वर्षी कामाठीपुरामध्ये दाखल झाली. बंगालमधून तिला फसवून मुंबईत आणलं होतं. कामाठीपुरात आणून विकलं गेलं. त्यानंतर गीताचे सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. कुठलाही पुरुष तिच्या जवळ आल्यावर त्याच्याबद्दल तिच्या मनात संशयच असायचा. पण ‘साई’चे विश्वस्त विनय वस्त यांच्या संस्थेशी जोडली गेल्यावर गीताचं आयुष्य थोडंफार का, होईना पण बदलून गेलंय. गेल्या २० वर्षांपासूनचं तिचं रक्षाबंधनचं स्वप्न पूर्ण होतंय. गेल्या दहा वर्षांपासून ती बॉलिवुड अभिनेता जे. ब्रॅंडन हिल आणि गेल्या पाच वर्षांपासून अभिनेता विजय कदम यांना राखी बांधतेय.
गीतासारख्या अनेक जणी ‘साई एनजीओ’च्या रक्षाबंधन कार्यक्रमास उपस्थीत होत्या. आयुष्यभर वखवखलेल्या नजरेने भोगवस्तू म्हणून बघणाऱ्या
अनेकजणींना ‘साई एनजीओ’मुळे हक्काचे भाऊ आणि मायेची ओवाळणी मिळाल्याची भावना होती.
‘साई’ एनजीओच्या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनच्या कार्यक्रमास कॅन्सर पीडित मुलांच्या माताही उपस्थित होत्या. रेश्मा तीन वर्षांची असताना तिला कॅन्सर झाला होता. रेश्माला वाचवण्यासाठी आई रीतूने वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. रेश्मा वाचली. काही वर्षांनी पुन्हा रेश्माला कॅन्सर झाला. त्यावेळी रीतू हतबल झाली. कारण रेश्माचे वडील तेव्हा जिवंत नव्हते. शेवटी रेश्माला वाचवण्यासाठी तिच्या आईने रीतूने गावची शेती विकली. रेश्माच्या वडिलांची मोटर सायकलही विकली. तरीही रेशमाच्या उपचारांसाठी खर्चाची सोय होत नव्हती. ‘साई’ एनजीओच्या संपर्कात आल्यावर रेश्माच्या उपचारांची सोय झाली. ‘साई’ फक्त रेशमाच्या उपचाराचा खर्च भागवत नाहीये तर रीतू यांना आर्थीक दृष्ट्या सक्षम्ही करत आहे. ‘साई’ यांनी रितू यांना एनजीओ तर्फे शिलाई मशीन भेट दिले आहे. त्या मशीनच्या मदतीने त्या टेलरिंगचं काम करून आपला उदरनिर्वाह आणि मुख्य म्हणजे रेश्माच्या पुढच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी स्वावलंबी होत आहेत. मुख्य म्हणजे रेश्माच्या आजारपणात त्यांचं माहेर सुटले होते. ‘साई’मुळे त्यांना हक्काचे माहेर मिळाले आहे. बॉलिवुड अभिनेता जे. ब्रॅंडन हिल, अभिनेता विजय कदम यांच्यासारखे पहाडाप्रमाणे भाऊ लाभले आहेत. त्यामुळे रितू दरवर्षी ‘रक्षाबंधन’ या सणाची आतुरतेने आत बघत असतात.
रितू सारख्या कॅन्सर पीडित मुलांच्या माताही या ‘रक्षाबंधन’ याआगळ्या-वेगळ्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.
सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात ‘साई’ मध्ये एनजीओमध्ये रक्षाबंधन या या सणाची सुरुवात ‘दीदी’ या प्रोजेक्ट पासून झाली. त्याविषयी संस्थेचे प्रमुख विनय वस्त सांगता, ” १९९१ पासून ‘साई’च्या माध्यमातून देहविक्रय करणाऱ्या एचआयव्ही बाधीत महिल्यांसाठी काम करू लागलो. त्यास महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी सुरुवातीला बोलू लागलो. पण माझ्याशी कोणीच बोलण्यास तयार नव्हत्या. सुरुवातीला तर मला त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. दीदी, ताई, माई करून बोलू लागलो तर जवळच उभ्या करायच्या नाहीत. कारण कुठल्याही पुरुषाकडे त्या ‘गि-हाईक’ म्हणूनच पाहायच्या. हळूहळू कामाठी पुरा, पिला हाऊस परिसरात राहणाऱ्या महिलांचा विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ‘दीदी’ हा प्रोजेक्ट राबवण्यास सुरवात केली. या प्रोजेक्टची सुरुवात ‘रक्षाबंधन’च्या सणाची सुरुवात करून केली. दीदी’मुळे मुंबईच्या रेडलाईट एरियात एचआयव्ही, एड्स विषयी जनजागृती निर्माण झाली आहे. इथले एचआयव्ही, एड्स बाधितांचे प्रमाण अगदी एक टक्क्यांवर आले आहे. चाइल्ड प्रॉस्टिट्यूशन पूर्णपणे थांबलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लोकप्रिय वाक्य आहे की, “गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिली तर तो बंड करून उठतो…” मुंबईतल्या रेड लाईट एरियामध्ये नेमक्या याच तत्त्वाचा अवलंब केला. आज त्याचे सकारात्मक परिणाम आपण सगळेच पाहत आहोत.
‘साई’च्या रक्षाबंधन कार्यक्रमात सहभागाविषयी अभिनेता विजय कदम सांगतात, “गेल्या पाच वर्षांपासून ‘साई’च्या रक्षाबंधन कार्यक्रमात मी सहभागी होत आहे. सामाजिक अन्याय, एड्स आणि मुलांसाठी शिक्षणासाठी लढणाऱ्या गरीब आणि वंचित देहविक्रय करणाऱ्या महिला आणि कॅन्सर पीडित मुलांच्या मातांचा
भाऊ होण्याची संधी मिळलीय, याहून मोठा सन्मान तो काय असावा?मी तर असे सांगेन की समाजातील अधिकाधिक लोकांनी ‘साई’च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. तरच समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल.”
बॉलिवुड अभिनेता जे. ब्रॅंडन हिल गेल्या दहापेक्षा अधिक वर्ष ‘साई’ एनजीओच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेत आहेत. शिवाय ते संस्थेचे ब्रँड अँबेसेडर
आहेत. संस्थेच्या अनोख्या उपक्रमाबद्दल जे. ब्रॅंडन हिल सांगतात, “गेली दहा पेक्षा अधीक वर्ष मी संस्थेशी संबंधीत आहे. संस्थेची स्थित्यंतरं आणी सकारात्मक बदल मी खूप जवळून बघितले आहेत. संस्था अशीच मोठी झाली पाहिजे, ज्यांच्यासाठी मी काम करत आहे, त्या सगळ्याची आयुष्य प्रगतीपथावर गेली पाहिजते.” असा आशावादही या वेळी जे. ब्रॅंडन हिल यांनी व्यक्त केला गेला.
गेल्या १३ वर्षांपासून कॅन्सर पीडित मुलांच्या मातांबरोबर आणि ३० वर्षांपासून मुंबईच्या रेड लाईट परिसरातील देहविक्रय करण्याऱ्या आणि एचआयव्ही बाधीत महिलांसाठी रक्षाबांधनचा उपक्रम राबवत आहेत. लॉकडाऊन नंतर दोन वर्षांनी ‘साई’ तर्फे ‘रक्षाबांधन’ उपक्रम राबवण्यात आला. सदर उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवुड अभिनेता जे. ब्रॅंडन हिल, अभिनेता विजय कदम यांच्या बरोबरीने भायखळा विधानसभेचे भाजप नेते रोहिदास लोखंडे आणि दिव्यांगां साठी काम करणारे डॉ. भूषण जाधव या मान्यवरांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
(लेखातील केसस्टडीजची नावं बदलली आहेत)
- संध्या धुरी-नाईक