एकीकडे पूणे महानगरपालिका देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची जोरदार तयारी करित आहे, मात्र दुसरीकडे केंद्र सरकार आणि कंत्राटदारांनी पालिकेला निकृष्ट दर्जाचे तिरंगा झेंडे पुरवले आहेत. त्यामुळे पाच लाख ध्वजांपैकी सुमारे चार लाख ध्वज पालिकेने केंद्राकडे परत केले आहेत. राष्ट्रध्वजाचा अनादर होऊ नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
यावर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा सन्मानपूर्वक फडकावावा ही विनंती केली आहे. राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले पाहिजे. त्यामुळे मध्यभागी अशोकचक्र नसलेले निकृष्ट आणि तिरपे कापलेले ध्वज आम्ही स्वीकारले नाहीत…खराब झालेले ध्वज कंत्राटदाराला परत केले जातात. झेंड्यांबाबत राजकीय पक्ष, संस्था, संघटनांकडून शंका घेतली जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत इतर ठिकाणांहून चांगले झेंडे मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले,
झेंडे मिळाल्यानंतर पालिकेने त्यांची तपासणी केली आणि ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. ध्वजाचे कापड दर्जेदार होते. तिरंग्यात अशोक चक्र मधोमध नाही, ध्वजावर रंगाचे डाग आहेत, कापड अस्वच्छ आहे, शिलाई चांगली नाही, काठीला जागा नाही. महापालिकेच्या ठेकेदाराने 2 लाख आणि शासनाकडील दोन लाख असे चार लाख झेंडे परत पाठवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने घराघरात तिरंगा फडकवण्याचे नियम शिथिल केले असून कापूस, पॉलिस्टर आणि इतर कापडापासून बनवलेले झेंडे लावण्यास परवानगी दिली आहे. त्याचे बहुतेक पुरवठादार सुरत, अहमदाबाद येथील आहेत. निकृष्ट ध्वजांची तक्रार केल्यानंतर असेच झेंडे उपलब्ध आहेत, अशी माहिती देण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्रात तिरंग्याचे झेंडे तयार करणारे मोजकेच उत्पादक असून मागणीही जास्त असल्याने ध्वज मिळणे अवघड असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पुन्हा चांगले झेंडे मिळवण्यासाठी पालिकेची धावपळ उडाली आहे.