आकोट – संजय आठवले
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव सौर ऊर्जा प्रकल्पात वन्य पशूंची शिकार केल्याप्रकरणी १२ आरोपी फरार असताना निर्मनुष्य झालेल्या या प्रकल्पात वन अधिकाऱ्यांच्या फेर तपासणी दरम्यान एक देशी कट्टा आढळून आल्याने या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा देशी कट्टा वन्य पशूंच्या शिकारीकरिता वापरला जात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. वन अधिकाऱ्यांनी हा कट्टा जप्त केला असला तरी या संदर्भात वन अधिकार्यांसह पोलीस तपासाचीही गरज निर्माण झाली आहे.
मागील महिन्यात तेल्हारा तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पात वन्य पशूंची शिकार होत असल्याचे वन अधिकार्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून या ठिकाणी त्यांनी चौकशी व वन्य पशुंच्या अवशेषाचे पंचनामे केले. त्या समयी येथे कार्यरत सारे कर्मचारी फरार झाले होते. केवळ २ कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी ह्या चौकशी पथकाला सहकार्य न करता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामूळे या ठिकाणी गैर कायदेशीर कृत्य होत असल्याचा संशय बळावला. त्यावरून वन अधिकाऱ्यांनी एकूण १६ जणांवर वन गुन्हे दाखल केले. त्यातील ३ आरोपींना अकोला येथे अटक केल्यानंतर त्यांना तेल्हारा न्यायालयातून जामीन मिळाला आहे. तर एका आरोपीस आकोट सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर ८ आरोपींनी आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनाकरितख अर्ज केला. परंतु न्यायालयाने तो फेटाळला आहे. आता उर्वरित ४ आरोपींनी आकोट न्यायालयात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केला आहे. त्यावर दिनांक १७ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
अशा स्थितीत या निर्मनुष्य सौर ऊर्जा प्रकल्पातील काही साहित्य नेल्या जात आहे. त्याकरिता दिनांक १५ डिसेंबर चे रात्री दोन कंटेनर या ठिकाणी आले. आकोट वन अधिकाऱ्यांना ही खबर मिळताच ते त्वरित येथे पोहोचले. या ठिकाणाची चौकशी सुरू असल्याने पुरावे नष्ट न होणेकरिता येथील कोणत्याही साहित्यास हाताळू नये अथवा येथे कोणतेही कामकाज करू नये असे आदेश वनपाल आर. टी. जगताप यांनी येथील सर्व कर्मचाऱ्यास व कंपनीचे वरिष्ठांना दिले होते. त्यानुसार या ठिकाणी कोणतीही हालचाल होणे निषिद्ध असतानाही या ठिकाणचे साहित्य हलविले जात असल्याचे पाहून आकोट वन अधिकाऱ्यांनी हे कंटेनर रोखले. वाहनधारकांची कागदपत्रेही हस्तगत केली. मात्र काहीच क्षणातच कोणतीतरी कळ दाबली गेली आणि ह्या कंटेनर्सना येथील साहित्य नेण्याची मोकळीक देण्यात आली.
त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे १६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अचानकपणे अकोला येथील वरिष्ठ वन अधिकारी उपवनसंरक्षक के आर अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ओवे यांनी बोर्डी वनरक्षक चंदू तायडे, कार्यालय मदतनीस सोपान रेळे, वाहन चालक विकास मोरे, वनमजूर सुमंत रजाने व दीपक मेहसरे यांना सोबत घेऊन सौरऊर्जा प्रकल्पाची तपासणी केली. त्यावेळी प्रकल्पातील किचन रूमच्या बाहेरील नालीमध्ये टोपीखाली दडविलेला देशी कट्टा या पथकाला आढळून आला. त्याचे निकटच तीन पातेली ही आढळून आलीत. हा सारा मुद्देमाल वन अधिकाऱ्यांनी जप्त केला. हा देशी कट्टा आढळल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली. हा कट्टा वन्य पशूंच्या शिकारीकरिता वापरल्या जात असल्याचा वन अधिकाऱ्यांचा प्राथमिक कयास आहे. नियमानुसार हा कट्टा ठसे तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे.
या दरम्यान येथे देशी कट्टा आढळून आल्याची खबर हिवरखेड ठाणेदार सुभाष चव्हाण यांना मिळताच त्यांनी चौकशी वन,अधिकारी आर. एन. ओवे यांच्याशी मोबाईलवर वार्तालाप केला. त्यातील मजकूर मात्र समजलेला नाही. परंतु ह्या देशी कट्ट्याने अनेक प्रश्नांना जन्म घातला आहे. हा कट्टा वन्य पशूंच्या शिकारी करिता वापरला गेला असेल तर त्याची चौकशी वन अधिकारी करतीलच. मात्र तसे निष्पन्न न झाल्यास हा कट्टा काहीतरी घातपात करून येथे दडविला गेला काय? या कट्ट्याद्वारे काही घातपात करण्याचा कुणाचा इरादा होता काय? की काही घातपात करण्याचे उद्देशाने आणला परंतु तसे न करताच घाबरून तो येथे दडवीला काय? या प्रश्नांची उत्तरे शोधणे शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. सद्यस्थितीत आकोट तेल्हारा या दोन्ही तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे निवडणुकीदरम्यान कुणाला धाक दाखविण्याकरिता या कट्ट्याचा उपयोग केला गेला काय? याचाही छडा लावणे गरजेचे आहे. त्यामुळे वनविभागासह या ठिकाणी पोलीस विभागानेही चौकशी करणे अगत्याचे झाले आहे. तूर्तास या प्रकरणात अजून काय निघते व चौकशीची दिशा कशी राहते? हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.