नांदेड – महेंद्र गायकवाड
सारथी व महाज्योती ह्या संस्था संबधित संशोधक विद्यार्थ्यांना विहित मुदतीत व वेळेत अधिछात्रवृत्ती प्रदान करते. मात्र बार्टी ही संस्था मागील १८ महिन्यांपासून संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्यास दिरंगाई करत आहे. सारथी व महाज्योतिच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या तुलनेत बार्टीकडे फेलोशीप मागणारे विद्यार्थी हे अत्यंत मागास व अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलं आहेत. महाराष्ट्र शासन व बार्टी प्रशासन या मागास संशोधक विद्यार्थ्यांबाबत एवढे उदासीन का? हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहे.
मागास विद्यार्थी जे संशोधन करतात ते संशोधन नाही का? असा प्रश्न संविधान दुगाने यांनी निवेदनात उपस्थित केला आहे. संशोधक विद्यार्थ्यांना पाठपुराव्या अंती बार्टी कार्यालयाकडून दिशाभूल करणारा पत्रव्यवहार केला जात आहे. संशोधन करणारे इतर संशोधक विद्यार्थी हे आपलं संशोधन कार्य व्यवस्थित पार पाडत असतांना ज्यांना खऱ्या अर्थाने फेलोशीप ची गरज आहे ते गरजू विद्यार्थी मात्र आज सरसकट फेलोशीपच्या मागणीसाठी या कडाक्याच्या थंडीत सलग दुसऱ्यांदा बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत ही मोठी शोकांतिका आहे.
बार्टी प्रशासन मुलाखत घेण्यावर ठाम असल्याचे समजते वेळोवेळी संशोधक विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा व मुलाखत रद्द करा व कागदपत्र पडताळणी करून सरसकट फेलोशीप द्या ही मागणी वारंवार करत असतांना बार्टी प्रशासनाची मुलाखत घेण्याची भूमिका ही संशयास्पद आहे. दोन दिवसांपासून आमरण उपोषणास अनेक महिला संशोधकांसह विद्यार्थी आमरण उपोषण करत आहेत मात्र बार्टी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने महिला संशोधिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
त्यापैकी एका संशोधक विद्यार्थिनींची तब्येत खालावली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव बार्टी प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेच्या निषेधार्थ दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बार्टी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे या कृत्यास सर्वस्वी जबाबदार बार्टी प्रशासन व महाराष्ट्र शासन असेल असे दुगाने यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, बार्टी चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, प्रधान सचिव,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई, पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क पुणे आदींना पाठवण्यात आले आहे.
संशोधन करून चांगले करिअर करता येईल या उद्देशाने अनेक गरीब घरातील मुलांनी विविध विद्यापीठात प्रवेश घेऊन पूर्णवेळ पीएच.डी करत असल्यामुळे त्यांना सर्वात अगोदर फेलोशिप मिळणे क्रमप्राप्त ठरते. केंद्र शासनाने नुकतंच २०२० मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला प्राधान्य देण्यात आले आहे. संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आदर्श समाज निर्मिती करणे हा कदाचित शासनाचा मानस असावा.
आज घडीला संशोधनाच्या माध्यमातून समाजासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांवर मात्र आर्थिक अडचणीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. कारण जवळपास 90 टक्के विद्यार्थी हे अल्पभूधारक शेतकऱ्यांची व मजुरांची मुलं आहेत. बार्टी पुणेच्या या वेळखाऊ धोरणामुळे मागील १८ महिन्यांपूर्वी रजिस्ट्रेशन होऊनही संशोधक विद्यार्थी फेलोशिप पासून वंचित राहिले आहेत. त्यामुळं तो आर्थिक संकटात सापडला आहे.
डिसेंबर महिन्या अखेर कागदपत्रांची पडताळणी नंतर फेलोशिप विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे. अशी मागणी यापूर्वी इंडियन पँथर सेना या सामाजिक संघटनेसह, इतर सामाजिक संघटनांकडून करण्यात आली होती.डॉ. बाबसाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशीप २०२१ करीता पात्र विद्यार्थ्याना अधिछात्रवृत्ती सरसकट फेलोशीप चा प्रस्ताव मा. नियामक मंडळ तसेच शासनास पुढील निर्णयास्तव सादर करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप मिळणे बाबतचा प्रस्ताव शासनास पुढील निर्णयास्तव संदर्भिय पत्र क्र.जा.क्र ५८४२ दिनांक. ०२/११/२०२२ अन्वये सादर करण्यात आलेला होता. बार्टीचे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये यांनी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सदर फेलोशीप संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता.