भाग्यश्री आत्राम यांचे आगार व्यवस्थापकाला साकडे
अहेरी – विधानसभेतील दुर्गम भागात बसफेऱ्या बंद असल्याने सामान्य नागरिकांसोबतच शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे रेगुंटा, दामरंचा आणि देचलीपेठा बसफेऱ्या त्वरित सुरू करण्यासाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी अहेरी आगाराचे व्यवस्थापकांना साकडे घातले.
पावसाळ्यात दुर्गम भागातील काही बसफेऱ्या बंद करण्यात येतात आणि पावसाळा आटोपताच परत बसफेऱ्या सुरू केले जातात.मात्र,यंदा पावसाळा आटोपून डिसेंबर महिना लागला तरी दुर्गम भागातील बसफेऱ्या सुरू करण्यात आले नाही. दुर्गम भागात भेटी दिल्यावर बसफेऱ्या बंद असल्याची कळताच भाग्यश्री आत्राम यांनी भ्रमणध्वनी द्वारे अहेरीचे आगार व्यवस्थापक युवराज राठोड यांना त्वरित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांनी दुर्गम भागातील बसफेऱ्या सुरू करण्याबाबत निवेदनही दिले.मात्र,अजूनही बसफेऱ्या सुरू न झाल्याने अखेर भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन आगार व्यवस्थापकांना साकडे घातले.
रेगुंटा,दामरंचा,देचलीपेठासह आदी गावात बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होत असलेली अडचण आगार व्यवस्थापकांच्या लक्षात आणून देऊन त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी आगार व्यवस्थापकांनी अहेरी-व्यंकटापूर-रेगुंटा रस्त्यावर वाहन जाण्यासाठी अडचण असल्याचे सांगितले मात्र,किमान व्यंकटापूर पर्यंत तरी नियमित फेऱ्या सुरू करा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आगार व्यवस्थापकांनी दुर्गम भागातील बसफेऱ्या सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच बसफेऱ्या सुरू होणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीकांत सावकार,राकाचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास मुक्कावार,नगरसेवक अमोल मुक्कावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.