वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो ऍड प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत एकत्र यायचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र भाजपविरोधात लढेल, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची दादर येथील राजगृह येथे झाल्याने ऍड बाळासाहेब आंबेडकर शिंदे गटा सोबत जाणार का अशी चर्चा सुरू होती मात्र काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच मंचावर आल्याने त्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे
काल ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले. या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“महाराष्ट्रात सध्या असणारं राज्य हे सुप्रीम कोर्टाच्या स्टे ऑर्डरवर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, त्यांनी स्टे ऑर्डरच्या याचिकेबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावा”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे. ताबोडतोब निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ. नंतर निवडणूक लागली तर नंतर येऊ”, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.
वंचिक बहुजन आघाडीच्या राजकीय ताकदीचा विचार केला तर लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार जिथे उभे होते तिथे अनेक ठिकाणी त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची लीड घेऊन ते पराभूत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे शिवसेनेला वंचित आघाडीची साथ मोलाची ठरू शकते.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमात भाषण करताना प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. “आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावंच लागेल. नुसतं लोकांना जागं करुन उपयोग नाही. आपण जर काही करणार नसू तर लोकं झोपली तर झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी नको करुयात. जागं करुन सोडणार असू मग ते न केलेलं बरं नाही. पण आपण ते करणार नसू तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.