Monday, November 18, 2024
Homeराज्यग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’...

ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’…

मुंबई – “जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर” आणि “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ येत्या १६ व १७ नोव्हेंबर रोजी दादर (पू) येथील शतकोत्तर रौप्य महोत्सवी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे.

या ग्रंथोत्सवाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे असतील व शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी दिली आहे.”मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय”, १७२, नायगाव, दादर (पू) येथे हा ग्रंथोत्सव होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत या जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, विक्री, ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याख्यान, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी ग्रंथ विक्री केंद्र उभारले जाणार आहेत.

वाचनप्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचन व खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे  शासकीय मुद्रणालयाची विविध प्रकाशन, राज्य मराठी विकास संस्था, दर्शनिका विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ , माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे लोकराज्य, साहित्य अकादमी, राष्ट्रीय पुस्तक न्यास इ. शासकीय संस्थांच्या विक्री केंद्रांचा समावेश असणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा
बुधवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ही ग्रंथदिंडी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू) येथून निघणार असून ती डॅा. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, गोविंदजी केणी रोड ते महात्मा फुले रोड तद्नंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय रोड मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचणार आहे.
त्यानंतर सकाळी ११ वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व शालेय शिक्षण तथा पालकमंत्री दीपक केसरकर हे ग्रंथ विक्री केंद्रास भेट देणार आहे.

दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके जन्म शताब्दी वर्षानिमित्त कवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांचे ‘कवितेतल्या शांताबाई’ या विषयावर व्याख्यान तर
दुपारी ४ ते ५.३० वाजेपर्यंत सह्याद्री वाहिनीच्या वृत्त निवेदिका दीपाली केळकर यांच्या मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे आणि समृद्धी दाखवणारा “शब्दांच्या गावा जावे” या अप्रतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मराठीतील दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॅा. दिलीप बलसेकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजता भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ विद्यार्थ्यांना ग्रंथांचे वितरण माजी राज्यसभा सदस्य डॅा. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होईल.

सकाळी ११.३० ते १ वाजेपर्यंत ‘वाचन संस्कृती – काल, आज आणि उद्या’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभागप्रमुख डॅा. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘ग्रंथोत्सव का व कशासाठी’ याविषयावर  परिसंवाद होणार असून यात ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, संजय बनसोडे, बांद्राच्या चेतना व्यवस्थापन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॅा. सिद्धी जगदाळे व माहिम सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यवाह सुषमा जोशी सहभागी होणार आहेत.            

ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात ग्रंथालयातील बाल सभासद, सर्वसाधारण व ज्येष्ठ नागरिक सभासद, वाचक, पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेत मुंबई केंद्रातील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा प्रातिनिधिक सत्कार केला जाणार आहे. त्यांनतर ग्रंथोत्सव कार्यक्रमाचा समारोप होईल.            

या ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक अच्युत गोडबोले असून स्थानिक खासदार राहुल शेवाळे, आमदार कालीदास कोळंबकर, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समिती आणि सह आयोजक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: