आकोट- संजय आठवले
आकोट शहरातील तीन ठिकाणच्या हरित पट्टा विकास कामांना जिल्हाधिकारी अकोला यांचेकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्याकरिता बनावट ठराव सादर केल्या प्रकरणी आकोट पालिका माजी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांचेवर गुन्हा दाखल करण्याच्या अकोला जिल्हाधिकारी यांचे आदेशाला अमरावती आयुक्तांनी स्थगनादेश दिला असून यासंदर्भातील पालिकेने आकोट पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी आयुक्तांकडून निकाल लागेपर्यंत माकोडे यांना दिलासा मिळाला आहे.
वाचकांस स्मरतच असेल की, आकोट शहरातील सहयोग कॉलनीतील पालिका जागेवर, कॉलेज रोड नजीकच्या पालिका जागेवर व नंदी पेठ येथे हरित पट्टा करण्याचा पालिकेचा मानस होता. त्यासाठी २ कोटी ९७ लक्ष १६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या कामांच्या प्रशासकीय मान्यते करता पालिकेकडून जिल्हाधिकारी अकोला यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु या प्रस्तावासोबत पालिकेकडून बनावट ठराव जोडण्यात आला. या ठरावाची पालिका इतिवृत्तात नोंदच केलेली नाही. पालिकेत कोणताही ठराव पारित झाल्यावर त्याची इतिवृत्तात नोंद घेण्याचे कर्तव्य पालिका अध्यक्षांचे असते. त्यामुळे पालिकेतील कोणत्याही कामाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेकरिता सादर करतेवेळी पालिका अध्यक्षांची स्वाक्षरी असलेल्या ठराव जोडला जातो.
त्याच प्रक्रियेअंतर्गत या हरित पट्टा कामांच्या प्रशासकीय मान्यतेकरिता पालिकेचे तत्कालीन अध्यक्ष हरिनारायण माकोडे यांची स्वाक्षरी असलेला ठराव जोडण्यात आला. मात्र या संदर्भात झालेल्या चौकशीत हा ठराव पालिका सभागृहात पारित झालाच नसून याची पालिका ईतिवृत्तांतही नोंद नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ह्या कामांची प्रशासकीय मान्यता रद्द करून हरिनारायण माकोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाचे विरोधात हरिनारायण माकोडे यांनी अमरावती आयुक्त यांच्याकडे धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन हरिनारायण माकोडे यांचे वर गुन्हा दाखल करण्यास अमरावती आयुक्त यांनी स्थगनादेश दिला आहे. या संदर्भात सह आयुक्त नपाप्र अमरावती माधुरी मडावी यांनी आदेश पारित करून “फक्त गुन्हा दाखल करण्याबाबतच्या कार्यवाही स्थगिती देण्यात येत आहे” असे मुख्याधिकारी आकोट यांना कळविले आहे. आयुक्तांच्या ह्या कार्यवाहीने हरिनारायण माकोडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात सुनावणी संपल्यानंतर आयुक्त अमरावती यांचे मत प्रतिकूल झाल्यास मात्र माकोडे यांचे अडचणीत वाढ होणार आहे. परंतु सद्यस्थितीत संपूर्ण भारतात भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता यांना कोणत्याही बाबतीत क्लीन चिट देण्याचा प्रघात रूढ झाला आहे. हरिनाम माकोडे हे भाजपचेच कार्यकर्ता आहेत. राज्यात भाजप, शिंदे गटाच्या युतीचे राज्य आहे. त्यामुळे माकोडे यांना याप्रकरणी क्लिन चिट मिळाल्यास आश्चर्य वाटावयास नको. विशेष म्हणजे हा ठराव बनावट असल्यावरही आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना पत्र देऊन माकोडेंची पाठराखण केलेली होती.
परंतु कायद्याला त्या पत्रापेक्षा वरचढ ठरवून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी माकोडें विरोधात निकाल दिला होता. त्यामुळे आपला अपमान झाल्याची आमदार प्रकाश भारसाकळे यांची धारणा होणे साहजिक आहे. त्यांचा इगो दुखावल्याने ते माकोडे यांना मदत करू शकतात. परंतु “अंदर की बात” अशी आहे की, नगराध्यक्षपदी निवडून आल्याने माकोडे यांना आमदारकीची स्वप्ने पडण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या समर्थकांत ते तसे बोलूनही दाखवीत असतात. त्यामुळे आमदाराच्या उमेदवारीकरिता पक्षातच आपला निकटतम प्रतिद्वंदी असलेल्या माकोडेंना भारसाकळे या प्रकरणात मदत करतील काय?हाही मोठा प्रश्न आहे. सांप्रत हे सारे गुलदस्त्यात असले तरी, काळाच्या पडद्यावरील बदलत्या दृष्यांमध्ये हेही दृष्य कधी ना कधी येणारच आहे. ते पाहणे रोचक ठरणार आहे.