कोकण – किरण बाथम
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या चिरनेर गावात चिरनेर ग्रामपंचायत, उरण पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी दिनांक २५ सप्टेंबर रोजी चिरनेर हुतात्मा स्मृती स्तंभा समोर ब्रिटिश सरकार विरोधात लढल्या गेलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत उरण पोलीसांकडून हुतात्म्यांना हवेत बंदुकीतून २४ फैऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्य संग्रामातील २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या उरण तालुक्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहातील आंदोलकांवर जुलमी ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला होता.
या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी ( चिरनेर ), रघुनाथ मोरेश्वर न्हावी ( कोप्रोली ), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील ( पाणदिवे ), हसूराम बुधाजी घरत ( खोपटा ), आलू बेमट्या म्हात्रे ( दिघोडे ) या आठ सत्याग्रहींनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.
चिरनेर जंगल सत्याग्रहात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे सदैव स्मरण रहावे आणि त्यांचा इतिहास भावी पिढीला ज्ञात व्हावा या हेतूने शासन स्तरावरून हुतात्मा स्मृती स्तंभा समोर दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने हुतात्म्यांचे वारसांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी केंद्रिय माजी मंत्री अनंत गीते, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, पी.पी. खारपाटील, राजाशेठ खारपाटील, अनिल मुंबईकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते प्रशांत पाटील,यांनी हि हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
चिरनेर जंगल सत्याग्रहाचे औचित्य साधून वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी तसेच आदिवासी बांधवांनी अक्कादेवी आदिवासी वाडीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी, आदिवासी बांधवांनी हुतात्मा नांग्या महादू कातकरी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मात्र या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रमासाठी शिवसेनेचे युवा नेते तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार राजन विचारे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी पाठ फिरवली आहे.