Monday, December 30, 2024
Homeसामाजिकरामटेक विधानसभा क्षेत्रात ७९ हजार महिला ठरल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी...

रामटेक विधानसभा क्षेत्रात ७९ हजार महिला ठरल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी…

( आमदार ॲड.जयस्वाल यांनी घेतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आढावा)

रामटेक – राजू कापसे

लाडकी बहिण योजने अंतर्गत मतदार संघातील सर्व महिलांना यांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आमदार ॲड. आशिष जयस्वाल सातत्याने पाठपुरावा करत आहेत . याच अनुषंगाने आज स्थानिक तहसिल कार्यालयामध्ये या योजेनची आमदार जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकारी व समिती सदस्यांची दुसरी बैठक पार पडली.

पहिल्या बैठकीत रामटेक, पारशिवणी व मौदा तालुक्यातील ७९ हजारा पेक्षा महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र त्यातील निम्मे अर्ज ऑनलाईन होणे बाकी होते. त्यानुसार तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना उर्वरित सर्व अर्ज ऑनलाईन करण्याचे आदेश आमदार जयस्वाल यांनी दिले होते.

या आदेशानुसार संबंधितांनी युद्ध पातळीवर काम करत सर्व अर्ज ऑनलाईन केले. त्यानुसार आज सर्व उर्वरीत अर्जाना मंजुरी देण्यात आली. असून जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करण्यासाठी प्रशासनाला विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना या बैठकीत आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असुन त्यामध्ये महिलांना दरमहा १५०० रुपये मानधन दिल्या जात आहे. यातील पात्र लाभार्थी महिलांना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आणि त्यानंतर सातत्याने, दोन महिन्याचे एकत्रित अनुदान असे ३ हजार रुपये थेट महिलांच्या आधार संलग्न असलेल्या खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये या योजने संदर्भात आनंदाचे वातावरण आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठीत करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने रामटेक विधानसभा मतदार संघाची समितीच्या अध्यक्षपदी आमदार ॲड. आशिष जयस्वाल हे असुन त्यामध्ये रामटेक, पारशिवणी आणि मौदा तालुक्याचे तहसीलदार,गटविकास अधिकारी,बालविकास प्रकल्प अधिकारी हे पदसिध्द सदस्य आहेत तर अशासकीय सदस्य म्हणुन जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती नंदाताई लोहबरे, राहुल मेंघर यांचा समितीमध्ये समावेश आहे.

मतदार संघात या योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी आ.जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज रामटेक तहसील कार्यालयात समितीची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी योजने संदर्भात माहिती घेतांना रामटेक तालुक्यातील ३३ हजार ७७९, पारशिवणी तालुक्यातील ३१ हजार ७२५ तर मौदा तालुक्यातील समाविष्ट गावातील १६१२३ लाभार्थी महिलांचे अर्ज पात्र ठरले असुन उर्वरित १९१३ महिलांचे अर्ज त्रुटी मध्ये असल्याने अपात्र ठरले आहेत.

त्यामुळे मतदारसंघातील ७८ हजार ४५० महिला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण ठरल्या. अपात्र महिलांच्या दस्ताऐवज आणि इतर तांत्रिक बाबीमुळे त्रुटी निर्माण झालेल्या आहेत या सर्व त्रुटी दूर करून त्यांना सुद्धा पात्र लाभार्थी करण्यासाठी प्रशासन कार्यरत असल्याची माहिती आमदार जयस्वाल यांनी यावेळी दिली.

तसेच मतदार संघातील सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रशासनाच्या वतीने विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यात जनजागृती करून विशेष मोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिला या योजनेच्या लाभार्थी ठरल्या पाहिजे यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आमदार जयस्वाल यांनी सांगितले.

यावेळी या बैठकीस रामटेक, पाशिवणी व मौदा येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, महिला बाल विकास अधिकारी, अशासकीय सदस्य नंदाताई लोहबरे,राहुल मेंघर, माजी जिल्हा परिषद संजय झाडे, शिवसेना शहरप्रमुख राजेश किंमतकर यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

३१ ऑगस्टला मुख्यमंत्री साधणार लाडक्या बहिणीशी संवाद..

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो महिलांना लाभ मिळालेला आहे. या योजनेत पात्र ठरलेल्या सर्व महिलांशी संवाद साधण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०२.०० ते ०४. ०० यावेळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर नागपूर शहरातील रेशीम बाग मैदानावर उपस्थित राहणार आहेत.

या संवाद सोहळ्यात मतदारसंघातील असंख्य महिला सहभागी होणार असून या सोहळ्याच्या नियोजना बाबत सुद्धा आमदार जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: