आकोट- संजय आठवले
आकोट तालुक्यातील शहानुर नदीकाठी वसलेल्या ग्राम नखेगाव येथील रहिवाशांवर पुराच्या पाण्याने मोठा गंभीर प्रसंग ओढवला असून नदीकाठ खचल्याने जमिनीला प्रचंड मोठ्या भेगा पडल्या आहेत. ह्या भेगांनी ६७ घरे डेंजर झोन मध्ये आली असून त्यावर त्वरित उपाययोजना न केल्यास ह्या ६७ कुटुंबांना बेघर होण्याची वेळ येणार आहे.
पावसाळ्याच्या सरत्या काळात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्याने आकोट तालुक्याला मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील नखेगाव हे गाव शहानुर नदीकाठी वसलेले आहे. हा भाग शेजारील सातपुडा पर्वताच्या पायथ्याचा डोंगर उतार असल्याने ही नदी प्रचंड वेगाने वाहते. अतिवृष्टीने या नदीने रौद्ररूप धारण केले. सततच्या वाहत्या पुराने नदीकाठ खचणे सुरू झाले आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने भूस्खलन होत आहे.
परिणामी गावापासून थोड्याशा अंतरावर असलेले नदीपात्र आता रुंदावत चालले आहे. रुंदावलेले हे पात्र आता गावातील घरापर्यंत येऊ लागले आहे. या ठिकाणी सन १९७९ पासून बांधून दिलेली इंदिरा आवास योजनेची घरे आहेत. आता त्या घरांच्या सभोवती पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजना या अंतर्गत अनेक घरे बांधलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी गरीब मजूर वर्गाचे अधिक्य आहे. नदीच्या पुराचा धोका लक्षात घेऊन स्थानीय ग्रामपंचायतने या लोकांना अन्यत्र स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु दैनंदिन मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या या रहिवाशांना अन्यत्र घरी बांधणे आवाक्या बाहेरचे आहे. त्यामुळे या लोकांना नेमके कुठे जावे? आणि काय करावे? हे सूचनासे झाले आहे.
त्यासाठी दिनांक २० सप्टेंबर रोजी बाधित गावकऱ्यांनी आकोट उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन आपले पुनर्वसन करण्याची मनधरणी केली आहे. या ठिकाणची आजची परिस्थिती पाहून जाता येत्या दहा वर्षात ही ६७ ही घरे जमीन दोस्त होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून या लोकांना शासन स्तरावरून मदत होणे ही काळाची गरज आहे.