सांगली – ज्योती मोरे.
जत मधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या घालून तसेच डोक्यात दगड घालून निर्घुणपणे खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यातील चार आरोपींना कर्नाटकातील गोकाक मधुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून तीन पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, दोन ज्यादा मॅगझीन, सहा पुंगळ्या, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली, दोन एअरगन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार उमेश जयसिंगराव सावंत हा फरारी आहे. याचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके घेत आहेत.
सदर फरारी आरोपी बाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली अथवा तपास पथकास द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून त्यास 25000 हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.