Tuesday, December 24, 2024
Homeगुन्हेगारीशहरांतर्गत अकोला मार्गाकरिता दोन कोटी मंजूर…आमदार भारसाखळेंचा पाठपुरावा… कंत्राटदार संतोष चांडकचे पाप...

शहरांतर्गत अकोला मार्गाकरिता दोन कोटी मंजूर…आमदार भारसाखळेंचा पाठपुरावा… कंत्राटदार संतोष चांडकचे पाप झाकले जाणार…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरांतर्गत रेल्वे पूल ते न्यायालयापर्यंतच्या मार्गाचे काम गत सहा वर्षांपासून सुरू असून त्याचा दोष सिद्धी कालावधी संपल्यानंतर आता या मार्गात दुभाजक निर्मितीचे काम सुरू असताना आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या पाठपुराव्याने ह्या मार्गाकरिता पुन्हा दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन कोटी रुपयांच्या खर्चाद्वारे हा मार्ग राज्य महामार्गाच्या दर्जाचा बनविण्याचा मानस असून ह्या कामामुळे कंत्राटदार संतोष चांडक यांचे पापही झाकले जाणार आहे.

आकोट शहरात प्रवेश करणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून अकोला मार्गाला मोठा मान आहे. शहरातीलच रेल्वे पुलापाशी हा मार्ग दर्यापूर मार्गासही जुळलेला आहे. हाच मार्ग पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तेल्हारा व अंजनगाव कडे वळता होतो. या मार्गावरच शहराची मुख्य बाजारपेठ जुळलेली आहे. त्यामुळे हा मार्ग प्रशस्त व सौंदर्ययुक्त होण्याकरिता आमदार भारसाखळे यांनी मोठा निधी मंजूर करून आणला.

शहरातीलच कंत्राटदार म्हणून या मार्गाचे काम संतोष चांडक या कंत्राटदारास देण्यात आले. सन २०१५-१६ पासून या मार्गाचे कामास प्रारंभ करण्यात आला. मात्र अद्यापही हे काम अपूर्णावस्थेतच आहे. शहर पोलीस ठाण्यासमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर ह्या मार्गाची स्थिती अतिशय केविलवाणी आहे. त्यापुढे न्यायालयापर्यंत हा मार्ग बऱ्याच ठिकाणी खस्ता हाल झालेला आहे. हा राज्य महामार्ग आहे. परंतु तब्बल सहा वर्षापासून हा मार्ग आपल्या दर्जानूरूप बनलेला नाही.

सद्यस्थितीत या मार्गाचा दोष सिद्धी कालावधी संपलेला आहे. आणि आता ह्या मार्गामध्ये दुभाजक निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गात काही ठिकाणी थिगळे लावून जुजबी डागडूजी केलेली आहे. मात्र हा राज्यमार्ग असल्याने ह्या मार्गाने अतिशय अवजड वाहनांची ये जा होत असते. त्यांच्या भाराने ही थिगळे फार काळ टिकणार नाहीत हे दारुण वास्तव आहे. या मार्गात दुभाजक निर्मिती व थिगळे लावण्याचे काम संतोष चांडकच करीत आहे.

ह्या अक्षम्य दिरंगाई बद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचेवर प्रतिदिन दंडही आकारला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता सुलताने यांनी सांगितले की, संतोष चांडक याचे २४ लक्ष रुपयांचे देयक विभागाकडून देणे आहे. दुभाजकाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम देयक देतेवेळी दंडाची ही रक्कम त्या देयकातून कपात केली जाणार आहे. हे कितपत खरे आहे ते आमदार भारसाखळे, उपविभागीय अभियंता सुलताने आणि संतोष चांडक यांनाच ठाऊक.

सहा वर्षानंतरही अपूर्णावस्थेत असलेल्या ह्या मार्गाकरिता आता आमदार भारसाखळे यांनी पुन्हा दोन कोटी रुपयांची मंजुरात मिळविलेली आहे. काल परवाच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी अर्थसंकल्पात हा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून रेल्वे पूल ते न्यायालयापर्यंत बीबीएम, कार्पेट व सिलकोट ही कामे करण्यात येणार आहेत. परंतु ही कामे आत्ताच करता येणार नाहीत. कारण 3 फेब्रुवारीपर्यंत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता जारी राहणार आहे.

त्यामुळे त्यादरम्यान या मार्गाच्या कार्यालयीन कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे. त्यानंतर प्रशासकीय व तांत्रिक मंजुरातीनंतर निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष कामात सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे मार्च एप्रिल महिन्यात हे काम सुरू होणार असल्याचा कयास आहे. मात्र मागील अनुभव जिवंत असल्याने हे काम आता संतोष चांडक याला देण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिशय गचाळ आणि बेपर्वा काम करण्याच्या पद्धतीमुळे संतोष चांडक याच्या नावाची नोंद काळ्या यादीत केली जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे हा मार्ग राज्य महामार्ग दर्जाचा करविण्याचा अंदाज बांधूनच या मार्गाचे अंदाजपत्रक बनविण्यात आलेले होते. त्यामुळे चांडकने त्या दर्जाचेच काम करणे अपेक्षीत होते. मात्र त्याच्या अपात्रतेमुळे हे काम गाव रस्त्याइतकेही झालेले नाही.

त्यामुळे राज्य महामार्गाचा दर्जा प्राप्त करण्याकरिता पुन्हा दोन कोटी रुपयांचा निधी या मार्गावर खर्ची घातला जाणार आहे. आणि सोबतच असा ढिसाळ मार्ग बनविण्याचे चांडकचे पापही झाकले जाणार आहे. म्हणूनच आपल्या माणसाचे पाप झाकण्या सोबतच त्याला काम देण्याचा आपला दोष दुरुस्त करण्याच्या आमदार भारसाखळे यांच्या ह्या प्रयत्नाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: