आकोट – संजय आठवले
निवडणूक प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी आकोट शहरात पार पडलेल्या जाहीर सभेत वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. आंबेडकर यांनी आकोट अकोला आणि आकोट तेल्हारा मार्गावर आमदार भारसाखळे यांचे मुळे १,५०० अपघातात ७५० माणसे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती दिली.
सोबतच एका बाजूला मराठा तर दुसऱ्या बाजूला कुणबी लिहून मतदारांशी फसवेगिरी करणाऱ्या आमदार भारसाखळे यांना पुन्हा मते न देण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी मतदारांना केले त्यांच्या या वक्तव्याने आकोट तेल्हारा मतदार संघात पुन्हा नवीन मुद्द्यांची चर्चा सुरू झाली आहे.
दि.१८ नोव्हेंबर रोजी ५ वा.
प्रचार बंद होण्यापूर्वी आकोट शहरात वंचित आघाडीचे सुप्रीमो ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचे वर सडकून टीकेची झोड उठवली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली कि, आकोट अकोला आणि आकोट तेल्हारा ह्या रखडलेल्या रस्त्यावर गत पाच वर्षांत १५०० अपघात झाले आहेत.
त्यामध्ये ७५० इसमांना मृत्युमुखी पडावे लागले आहे. ही माहिती देऊन त्यांनी ह्या मृत्यूंकरिता जबाबदार कोण? असे उपस्थितांना दोनदा विचारले. त्यावर उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद देऊन भारसाखळे यांचे नाव उच्चारले.
उपस्थितांकडून भारसाखळे यांचे नावावर अशा प्रकारे शिक्कामोर्तब करवून ॲड. आंबेडकर म्हणाले कि, केवळ १०, १५,२० टक्के कमिशन न मिळाल्याने दोन्ही मार्गांचे काम रखडविले गेले. त्यामुळे १५०० अपघात होऊन त्यात ७५० माणसे दगावली. म्हणजेच भारसाखळे यांनी माणसे मारण्याचे काम केले आहे.
त्यामुळे ज्या कुणाला आपल्या घरात अशा प्रकारची मौत हवी आहे, त्यांनी भारसाखळे यांना मते द्यावीत. यावर उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद देऊन भारसाखळे यांचे बाबत आपली नाराजी प्रकट केली. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी भारसाखळे यांच्या फसवेगिरीचे सप्रमाण स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले कि, भारसाखळे एका बाजूने स्वतःला मराठा संबोधतात, तर दुसऱ्या बाजूने कुणबी संबोधतात. असे करून ते मतदारांशी फसवेरीचा खेळ करीत आहेत. त्यांना मत मागायचे असेल तेव्हा वस्ती बघून ते पुड्या बांधण्याचे काम करतात. अर्थात भारसाखळे मराठ्यांच्या वस्तीत मराठा तर कुणब्यांच्या वस्तीत कुणबी बनून जातात.
त्यामुळे अशी फसवेगिरी करणारे भारसाखळे पुन्हा विधानसभेत जायला नकोत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या या वक्तव्याने आकोट तेल्हारा मतदार संघात भारसाखळें बाबत नवीन मुद्द्यांची भर पडली आहे. त्याने त्यांची वाट अधिकच बिकट होत चालली आहे.