आकोट संजय आठवले
जुनी पेन्शन योजना लागू करणेसंदर्भात राज्यातील विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ओ देऊन आकोट तालुक्याच्या विविध विभागातून १००० कर्मचारी संपात उतरल्याचे चित्र आहे. या संपात महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना सामील झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रामेश्वर वाघमारे, कार्याध्यक्ष विश्वनाथ घुगे, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप रावणकर, प्रदेश सरचिटणीस सुरेश पोस्तांडेल तसेच प्रदेश कोषाध्यक्ष अनिल पवार, संघटक केशव कानपुडे तसेच सफाई कामगार संघटनेचे पी.बी. भातकुले, अनुप खरारे, जयसिंग कछवाह, शांताराम निंदाने यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील आकोटचे ईश्वरदास पवार, विजय सारवान, राधेश्याम मर्दाने, प्रवीण चंडालिया, मूर्तिजापूरचे शिरीष गांधी, रवी सारवान, बाळापूरचे इत्तेखार शहा, अजय चावरीया, तेल्हाराचे श्रीकृष्ण पोहरकर, ईश्वर सारवान, पातुरचे सय्यद रसूल सय्यद चांद, मदन खोडे बार्शीटाकळीचे रुपेश पिंजरकर यांचे नेतृत्वात अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत.
तसेच आकोट तालुक्याच्या विविध विभागातून संपाला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये आकोट नगर परिषदेतून सफाई कामगारांसह २१० कर्मचाऱ्यांपैकी २०३ कर्मचारी संपात उतरले आहेत. ७ जण रजेवर आहेत. आकोट तहसील कार्यालयातून २४ कर्मचाऱ्यांपैकी २१ जण संपात सामील झाले. तर २ जण रजेवर आणि १ जण कार्यालयात उपस्थित आहे. उपविभागीय कार्यालयातून ७ पैकी ७ही जण संपावर आहेत. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून २१ पैकी १७ लोक संपावर असून ३ जण रजेवर तर १ उपस्थित आहे. श्री शिवाजी महाविद्यालय आकोटच्या १७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १६ जण संपात तर एक दीर्घ रजेवर गेला आहे. आकोट पंचायत समितीच्या अ व ब संवर्गातील कुणीच संपाला प्रतिसाद दिलेला नाही. परंतु साधारण प्रशासन विभाग गट क मधील २६ कर्मचाऱ्यांपैकी २३ जण संपावर तर १ जण रजेवर आहे. या विभागाच्या गट ड मधील ५ पैकी ५ ही कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. तालुक्यातील ४६ ग्रामसेवकांपैकी सर्वचजण संपावर गेले आहेत. ५१८ जिल्हा परिषद शिक्षकांपैकी केवळ ७९ शिक्षकांनी संपाला प्रतिसाद दिला आहे. तर पशुसंवर्धन विकास विभागातून १८ पैकी १८ ही जण संपात उतरले आहेत. महिला व बालकल्याण मधून ३ पैकी ३ जण संपावर आहेत. बांधकाम विभागातून १० पैकी ८ जणांनी संपात जाणे पसंत केले आहे. लघु सिंचन चे ३ पैकी ३ लोक संपावर गेले आहेत. जिल्हा परिषद शाळा आकोट मधून १३ पैकी केवळ ४ लोक संपात सहभागी आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगावच्या १४ पैकी १४ ही कर्मचारी संपावर गेले आहेत. सावरामधून २१ पैकी १६, कावसा येथून २१ पैकी १५ तर पोपटखेड येथून ९ पैकी ७ जणांचा संपात समावेश आहे. आकोट तालुक्यात एकूण ५४ शाळा अनुदानित आहेत. त्यामध्ये जवळजवळ १,००० शिक्षक कार्यरत आहेत. त्यामधील ४०० चे वर शिक्षक संपात सामील असल्याची माहिती आहे. २० मार्चपर्यंत संपाबाबत कोणताही तोडगा न निघाल्यास तलाठी वर्गही संपात उतरणार असल्याचे तलाठी कर्मचारी संघटने कडून सांगण्यात आले.