·        जिल्हा महिला व बाल विकास विभागाची सतर्कता

वाशिम, दि. १३(अजय ढवळे)  : जिल्ह्यातील मजलापूर (ता. मंगरूळपीर) येथील एका १५ वर्षीय मुलीचा विवाह आज जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रोखला गेला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह मंगरूळपीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. के. कांबळे, ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी कु. दिपाली वाकोडे यांनी मुलीच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले व तसेच मुलीचा बालविवाह न करण्याचे हमीपत्र घेतले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. राठोड यांना सकाळी मजलापूर येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ मजलापूरच्या ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी कु. वाकोडे यांना याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी दिलीप राठोड व कर्मचारी यांनी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती देऊन बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. राठोड यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना कुठेही बालविवाह घडत असल्यास चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच बालविवाह केल्यास संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले असल्याने सर्व ग्रामसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारचे बालविवाह होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहनही श्री. राठोड यांनी यावेळी केले.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result