राजू थोरात सांगली
हेअर क्लिनिकवर छापा  तिघा बोगस डॉक्टरांसह एकाला अटक 
 वैद्यकीयऐवजी कॉमर्स शाखेच्या मुलींकडून केश प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेतल्याचा प्रकार बुधवारी सांगलीतील एका हेअर ट्रान्सप्लान्ट क्लिनिकमध्ये उघडकीस आला. महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने हेअर ट्रान्सप्लान्ट केंद्रावर छापा टाकून तीन बोगस डॉक्टरांसह एकाला पोलिसांच्या हवाली केले. या केंद्राला सीलही ठोकण्यात आले आहे.
या कारवाईत कविता अशोक हेरवाडे, योगेश नंदकुमार पोखरणा, सिमरन अभिजित दळवी आणि चित्रा अनिल झाड या चौघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राममंदिर रोडवरील इंद्रनील अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर हेअर ट्रान्सप्लान्ट नावाचे एक केंद्र बेकायदेशिररित्या सुरू होते. या केंद्रात केसांचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया, तसेच इतर केसांच्या विकारांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे. या ठिकाणी शस्त्रक्रिया करणाºया महिलांकडे कॉमर्स शाखेची पदवी असून त्यांच्याकडे अन्य कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा पदवी नाही.
कोणताही वैद्यकीय परवाना नसतानाही येथे केस प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. या बेकायदा केंद्राबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती मिळताच बुधवारी महापालिकेच्या पथकाने या केंद्रावर छापा टाकला. यावेळी येथे काही तरुणी एका रुग्णाच्या डोक्यावर केश प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करीत असताना रंगेहात पथकास सापडल्या.
या कारवाईत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर, संजय अष्टेकर, महेंद्र गोंजारी, सुरेंद्र शिंदे, किरण आनंदे, प्रतिभा माने, सुनीता वाघमारे, नितीन हौसे, अक्षय चव्हाण यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईमुळे खळबळ उडाली होती.
वाणिज्य पदवीधर मुलीकडून उपचार
या सर्वांना वैद्यकीय पथकाने ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हे केश प्रत्यारोपणाचे केंद्र विनापरवाना असल्याचे समोर आले. ज्या रुग्णावर केश प्रत्यारोपण केले जात होते, त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते, अशी शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय शल्यचिकित्सकाची आवश्यकता असते. मात्र, याठिकाणी चक्क वाणिज्य शाखेच्या मुलींनी शस्त्रक्रिया करण्याचे काम सुरू ठेवले होते. याचबरोबर औषधे आणि सिरींजसुद्धा महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी तिघा बोगस डॉक्टरांसह चौघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. हे केश प्रत्यारोपण केंद्र सील करण्यात आले आहे.
महिलादिनाच्या पूर्व संध्यालाच घटनेमुळे खळबळ उडाली आहे,

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result