किशोर आपटे ९८६९३९७२५५


गेल्या दोन वर्षांपासून राज्यात शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवर सातत्यांने फार मोठ्या घडामोडी होत राहिल्या आहेत. सध्या सत्तेवर असलेल्या उजव्या विचारांच्या भारतीय जनता पक्षाचे सरकार हे बुध्दिवाद्यांचे आणि भांडवलदारांचे सरकार आहे म्हणजेच राजकीय टिपणीच्या भाषेत ‘भटजी आणि शेटजी’ यांचे सरकार आहे. आणि या सरकारला ‘शेती आणि शेतकरी’ यांच्याशी त्यांच्या प्रश्नांशी काहीच देणे घेणे नाही या सार्वत्रिक समजांतून जी मनोवैज्ञानिक राजकीय भुमिका घेण्यात आली आहे तीचा हा परिपाक आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळेच मग शेतकरी आत्महत्यांपासून, मराठा क्रांती मोर्चा पर्यंत, पुणतांब्याच्या आंदोलन-शेतकरी संपापासून, राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश आंदोलनापर्यंत आणि आता डाव्या संघटनांच्या बारा मार्चच्या ‘लॉंग मार्च’ म्हणजेच शेतकरी दिंडीपर्यंत या ‘सरकारच्या विरोधात शेतकरी’ असल्याचे चित्र दिसते आहे. त्याशिवाय वेळोवेळी राज्यातील कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर केलेल्या ‘हल्लाबोल’ पासून ‘संघर्ष’ पर्यंतच्या यात्रा आणि मंत्रालयात सहाव्या मजल्यावर येवून उड्या मारण्यापासून विष प्राशन करण्यापर्यंतच्या गेल्या काही दिवसांतील घटना हेच दाखवून देतात की हे सरकार शेतकरी आणि शेतीच्या विरोधात आहे की काय?
    दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारपासून देवेंद्र फडणविस यांच्या राज्यातील सरकार पर्यंत ‘शाश्वत शेती’ कशी करता येईल? याच्या नवनविन कल्पना आणि योजना आणल्याचे दावे केले जात आहेत. केंद्राचा यंदाचा अर्थसंकल्प पाहिला तर डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या शिफारशी लागू करण्यापासून शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट भाव देण्यापर्यंतच्या घोषणा केंद्र आणि राज्य सरकारने केल्या. शेतीच्या व्यवसायाला पूरक भुमिका कृषीमुल्य आयोग घेत असल्याचे पूर्वाश्रमीचे शेतकरी नेते असलेले आणि आता राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष असलेले पाशा पटेल सांगत आहेत. सुक्ष्म सिंचना पासून निम युक्त युरीया पर्यंतच्या शेतकी सुधारणा केल्याची व्दाही समाज माध्यमांपासून सरकारी जाहीरांतीपर्यंत सारीकडे फिरवली जात आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारखे शेतीची जाण असलेले नेते कृषीमंत्री आहेत. महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांच्यासारखे ‘शेतकरी नेते’ या सरकारमध्ये महत्वाच्या भुमिका घेण्यासाठी सज्ज आहेत. तरीही या शेतकरी प्रश्नांवर राजकीय-सामाजिक संघर्षाच्या भुमिकांचा जोर कमी का होताना दिसत नाही? राज्य सरकारने गेल्या आठ महिन्यात सारी सरकारी विकासाची कामे ३० टक्के खर्चाला कात्री लावून बाजुला ठेवली आणि ३४ हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीला पारदर्शी आणि दूरदर्शीपणे दिल्याचे सांगितले, आता जणू शेतक-यांचे प्रश्न संपले असे सा-यांना वाटावे तोच विधानभवनाच्या दारात ‘शेतीला समर्पित अर्थसंकल्प’ सादर करून काही तास उलटले नाहीत तोच लाल बावटे घेवून रक्ताळलेल्या पायांनी शेकडो किलोमीटर चालत आलेल्या शेतक-यांचे जथ्थे आक्रोश करत घेराव करण्याची भाषा करत येवून उभे ठाकले!  डाव्या आघाडीच्या या शेतकरी दिंडीने सरकारला असे खिंडीत गाठले म्हणून मनात खुश झालेल्या दोन्ही कॉंग्रेस आघाडी पासून मनसे, आम आदमी आणि सत्तेत राहून विरोधात असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईच्या वेशीवर स्वागत देखील केले आहे. जणू ही ‘दिंडी’ नसून सरकारला नामोहरम करायची ‘संधी’ आहे अश्या थाटात याचे चित्रण केले जात आहे. 
दोनच दिवसांपूर्वी विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने अर्थव्यवस्था बिकट स्थितीत असल्याचे लपवून ठेवत शेती क्षेत्रात पायाभूत सेवा सुविधा देण्यासाठी जलसंपदा ८०२३३.१२ कोटी, जलयुक्त शिवार १५०० कोटी, विहीरी शेततळी सूक्ष्म सिंचन यांसाठी ४३२कोटी आणि १६० कोटी, वनशेतीसाठी १५ कोटी, शेतमाल साठवणूक आणि सेंद्रीय शेती सुधारणा यासाठी शंभर कोटीपेक्षा जास्त, फलोत्पादन विस्तार योजना १००कोटी, मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रीया योजने साठी ५०कोटी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने साठी अतिरिक्त निधी, कृषी पंपासाठी ७५०कोटी, राष्ट्रीय कृषी बाजारसाठी केंद्र सरकारच्या ९ कोटी रूपयांच्या योजनेत राज्याचे योगदान, रेशीम लागवडसाठी ३ कोटी रूपये अश्या जवळपास ‘एक लाख कोटी रूपयां’च्या तरतूदींची शिफारस केली आहे. मात्र शेती हा राज्यातील महत्वाचा उद्योग आहे ज्यावर ६० टक्के पेक्षा जास्त जनता आणि आर्थिक प्रगती अवलंबून आहे हे पाहता या उपाय योजना पुरेश्या नाहीत हे वास्तव आहे. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी तसे अर्थसंकल्पानंतर पत्रकारांशी बोलताना मान्यच केले, या क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक करावी लागेल जे केवळ सरकारचे काम नाही मात्र सध्याच्या काळात गेल्या ‘साठ सत्तर वर्षात जे झाले नाही ते आम्ही केले’ किंवा करतो आहोत असे खुद्द सरकारचे प्रमुखच उच्च कंठरवाने सांगत फिरत आहेत. त्यामुळे मग ‘हे काही नाही?’ असे लोक विचारणारच! त्यामुळे मग आशा-अपेक्षा वाढवून जनतेला घायकुतीला आणणा-यांनी आताच्या या आततायी राजकीय भुमिका देखील झेलल्या पाहीजेत नाही का? 
शेतकरी दिंडी मुंबईच्या दारात आली हे समजताच प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधक दोघांची जी हबेदंडी उडालेली दिसली ती पाहता जणू मुंबईत ‘राजकीय चक्रीवादळ’ आले की काय? असे वाटू लागले. जीवा पांडू गावित हे माकपाचे एकमेव आमदार या मोर्चाचे नेतृत्व करत असताना त्यांच्या सोबत अजित नवले आणि अशोक ढवळे असे माकपाचे नेते एकदम प्रकाशझोतामध्ये आले आहेत. ‘डावे’ असले म्हणून काय? ‘ते कालवे नाहीत शतेकरी आहेत’ अश्या शेलक्या कोटी करण्यापासून, आणि ‘एकदा माझ्या हाती सत्ता देवून पहा’ असे या लाल रक्ताळलेल्या पायांच्या बळीराजांच्या समूहाला आवर्जून सांगून काही नेत्यांनी आपली भाषणाची हौस सुध्दा भागवून घेतली. प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या बोलण्यात हे ‘आपल्याला का जमले नाही?’ असा विशाद पाठिंबा जाहीर करताना जाणवला तर सरकार मध्ये प्रत्येक योजनेला ‘मुख्यमंत्री. . .  योजना’ असे नाव देण्याची ‘टूम’ असताना या मोर्चाला मात्र सामोरे जाण्यासाठी मंत्र्यांची ‘टिम’ तयार करण्यात आली!  मोर्चेक-यांच्या मागण्या काय आहेत? त्यांच्यासाठी चर्चा करायला सरकार ‘रात्रीच’ तयार आहे असे सांगत शेतकरी कल्याणासाठी ‘पहाटेपर्यंत चर्चा’ करण्याचा ‘जुना फार्स’ करून बघण्याचा प्रयत्नही झाला!  मात्र नवले आणि ढवळे यानी त्याला चक्क नकार देवून दिवसा दुपारी बारा वाजता चर्चेला येण्याचे मान्य केले. म्हणजे सरकारला आता या प्रश्नातून आर्थिक-सामाजिकदृष्ट्या तर शेती आणि शेतकरी यांचे प्रश्न जाणून समजावून घ्यावे लागतीलच शिवाय राजकीय दृष्ट्याही ते सोडवावे म्हणून लेखी आश्वासन द्यावे असा मार्च च्या नेत्यांचा आग्रह आहे. 
त्रिपूरात डाव्यांच्या सत्तेला सुरूंग लावला म्हणून जल्लोष करताना उजव्या विचार सरणीच्या सरकारला आता आपल्या ‘दारात डाव्या संघटना कश्या सर्वशक्तीने आव्हान’ देत आहेत. त्याची ही सुरूवात म्हणावी लागेल. हे आंदोलन यशस्वी झाले, त्यामुळे या शक्तीना आता नवा मार्ग गवसला आहे, त्यात डाव्या विचारांच्या गेली काही वर्षे विध्वंसक मार्गाकडे गेलेल्या त्यांच्या अनुयायीना मुख्य प्रवाहाकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे असेल  आणि तर तो प्रयत्न देखील सुफल होत असल्याचे दिसले तर अश्या प्रकारे डावे आणि उजवे यांचे  आर्थिक-सामाजिक भुमिकांवरील राजकीय खटके आता नित्याचे होतील की काय? अशी चिंता देखील पुरोगामी आणि उजव्या प्रस्थापित राजकीय नेत्याना लागली आहे. शेतकरी ‘दिंडी’ ही नव्या राजकीय समिकरणांची ‘नांदी’ ठरणार आहे ते त्यामुळेच! ‘नव्या मनूचा उदय’ म्हणून या घडामोडी महत्वाच्या आहेत. 


 

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result