किशोर आपटे 

विरोधात असताना भाजपाच्या नेत्यानी केलेल्या अताव्यस्त घोषणा आणि सत्तेत आल्यावर त्याला वास्तवाची जोड न दिल्याचा परिणाम आर्थिक शिस्त कोलमडण्यात झाली आहे. राज्याची नाजूक आर्थिक स्थिती चिंताजनक असली तरी सत्ताधा-यांचा उत्साह पाहिला आणि त्यांच्या कल्पनांचा मागोवा घेतला तर सरकार आर्थिक बाबीत अतिदक्षता कक्षाच्या दारात आहे हे सांगून टाकलेले बरे !

‘आमदानी अठन्नी खर्चा रूपय्या, नतीजा ठणठणगोपाल!’ या फिल्मी गीतासारखी स्थिती सध्या राज्याच्या अर्थ व्यवस्थेची आहे हे  ८  तारखेला हाती आलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून आणि त्या नंतर दुस-याच दिवशी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी सादर केलेल्या अर्थसकलंपातून दिसून आले आहे. महाराष्ट्र शासनाचे आर्थिक नियोजन गडगडले आहे आर्थिक शिस्तीचा जो आग्रह सध्याचे मुख्यमंत्री विरोधीपक्षात असताना धरत होते ते त्यांचे धोरण सध्या दिसत नाही त्यामुळेच राज्याची वित्तीय तूट ३८ हजार कोटी तर महसुली तूट १५ हजार ३७५ कोटींवर पोहोचली आहे हे दिसून आले.
  वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत सन २०१८-१९ साठी त्यांच्या कारकिर्दीतील चवथा अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षी २०१७-१८ साठी रु.३ लाख ३९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्या तुलनेत आता सादर केलेला अर्थसंकल्प रु. ६६ हजार ९८४ कोटी लाखांनी अधिक आहे. म्हणजेच तो रु. ३ लाख ६७ हजार ३८१ कोटींचा आहे. सन २०१८-१९ मध्ये एकूण महसूली तूटे वाढली असून ती रु. १५३७४ कोटी ९० लाखांवर गेली आहे. याचे अर्थसंकल्पानंतर बोलताना लंगडे समर्थन देखील वित्तमंत्री करतात, ते म्हणाले की जर कर्जमाफी दिली नसती तर हा आकडा कदाचित ५ ते ७ हजार कोटीनी कमी दिसला असता. म्हणजे राज्य सरकारने स्वत:च्या तिजोरीवर भार टाकून शेतकरी हित जपले असे त्यांना म्हणायचे होते. त्याचवेळी ते सांगतात की,सन २०१७-१८ ची महसुली जमा रु.२ लाख ५७ हजार ६०४ कोटी होईल असे सुधारित अंदाज सांगतात. मात्र त्या वेळेस महसुली खर्च देखील  सुधारीत अंदाजानुसार रु. २ लाख ७२ हजार ४४८ कोटी २६ लाखांवर जाणार आहे. याचा अर्थ महसुली तूट  काहीशी कमी म्हणजे रु. १४ हजार ८४३ कोटी ४४ लाख होणार आहे. 
 मात्र  सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकानुसार महसूली जमा  रु.२ लाख ८५ हजार ९६७ कोटी ९६ लाख असून महसुली खर्च रु. ३ लाख १हजार ३४२ कोटी ८६ लाखांवर जाणार आहे. याचा अर्थ हे अंदाज खरे मानले तर महसुली तूट रु. १५ हजार ३७४ कोटी ९० लाखांवर जाणार आहेच. हे असे का झाले याचे मुख्य कारण वस्तू व सेवा करातून (जीएसटी) जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या ८ महिन्याच्या कालावधीत केवळ रु. ४५ हजार ८८६ कोटी महसूल जमा होऊ शकला. यातूनच स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि मुंबई महानगरपालिकेत जकात रद्द केल्यामुळे रु. ५ हजार ८२६ कोटी इतर महानगरपालिकांना रु. ५ हजार ९७८ कोटी असे एकूण  रु. ११ हजार ८०४ कोटी  द्यावे लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाची वित्तीय तूट रु. ३८ हजार कोटींवर गेली आहे. तर ही आहे सध्याची सरकारची आर्थिक स्थिती वस्तू आणि सेवा कराचा आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही मात्र सरकार किंवा वित्तमंत्री यानी तसे स्पष्ट कबूल करण्याचे धाडस दाखवले नाही इतकेच त्याची कारणे देखील उघड आहेत. सध्या राज्यावरील एकूण कर्ज रु. ४ लाख ६१ हजार ८६० कोटींवर पोहोचले आहे. म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरिकावर रु.४१०८६ एवढा कर्जाचा भार येणार आहे. सरकारमात्र दरडोई उत्पन्न वाढल्याची दवंडी पिटताना दिसत आहे.
ही स्थिती येण्यामागील आणखी महत्वाचे कारण म्हणजे राज्य शासनाने जुलै २०१७ मध्ये शेतक-यांसाठी रु. ३२ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली त्याला आज ८ महिने पूर्ण झाले मात्र त्यापैकी केवळ रु. १३ हजार कोटी रक्कम ३५ लाख ६८ हजार शेतक-यांना त्याचा लाभ मिळणार असून रु. १९ हजार कोटींच्या कर्जमाफी पासून आजही शेतकरी वंचित आहेत. यामधील तफावत आता सरकारने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून येत असून बँकानी शेतक-यांच्या नावे मागील काळात दिलेल्या ‘बोगस’ कर्जांची पडताळणी आता नव्या पध्दतीने केलेल्या कर्जमाफीमुळे उघड होण्याची चिन्हे आहेत. सुमारे वीस  हजार कोटी रूपयांच्या कर्जाच्या रकमा का शेतक-यांच्या खाती जमा होवू शकत नाहीत याचे कारण ‘ओटीएस’ म्हणजे जास्तीचे कर्जाचे हप्ते शेतक-यांनी भरल्यावर त्यांना सरकारी पैसे वळते करण्याचा निकष मध्ये आला आहे असे सांगण्यात येत आहे. त्यात ज्यांनी दिड लाखा पेक्षा जास्त कर्ज थकवली आहेत अश्या किती शेतक-यांची ही कर्ज योग्य आहेत ते केवळ बँकाच जाणोत! 
दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे आता ७व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे राज्य शासनाचे कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना द्याव्या लागणा-या वेतनासाठी रु.२१ हजार कोटींचा भार राज्य शासनावर येणार आहे. सध्याच राज्य सरकारने कर्ज घेण्याची उच्चतम पातळी गाठली असून सन २०१७-१८च्या तुलनेत सन २०१८-१९ मध्ये  राज्यावरील कर्ज रु. ५४ हजार ९९६ कोटींनी वाढले आहे. म्हणजे राज्य सरकारने कर्ज घेण्याची उच्चतम पातळी गाठली असून व्याज व कर्जाच्या परतफेडीचा वाढत्या दायित्वामुळे शासन मेटाकुटीला आले आहे. शासन नादारीच्या दारात असताना त्याला सवंग घोषणा देवून लोकांच्या वाढवून ठेवलेल्या राजकीय आशा- आकांक्षा देखील पूर्ण करायच्या आहेत. मात्र सध्याच्या आर्थिक स्थितीचा परिणाम म्हणून सन २०१७-१८ मध्ये सर्व विभागांचा एकूण खर्च ४३ टक्क्यांवर ही होऊ शकला नाही. तर एकूण विभागांपैकी सार्वजनिक बांधकाम ९.२८ टक्के, जलसंपदा १०.४८ टक्के, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण १३ टक्के, गृहनिर्माण ४.५४ टक्के, पर्यावरण ४.९५ टक्के तर अल्पसंख्यांक विकास विभागाचा खर्च१५.७३ टक्के इतका कमी झाला आहे. निधीच्या तुटवड्यामुळे आदिवासी विकास विभाग, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजना, रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार योजना यांची कामे मंदावली असून रोजगारामध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यावरून राज्याच्या आर्थिक स्थितीची आपल्याला कल्पना येते. 
त्यामुळेच आगामी काळात जर राज्य शासनाने महसुली वाढीवर लक्ष दिले नाही तर वेगवेगळ्या योजनावर होणा-या खर्चात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण होणार असल्याचे अभ्यासातून लक्षात आले आहे. जीएसटीमुळे आता नव्याने कोणतेही कर सरकारला लावता येणार नाहीत याचे दुसरे कारण आता निवडणुकांचे वर्ष जवळ येत आहे जनतेला करांचे ओझे देताना सरकारला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे वित्तमंत्र्यांनी जरी रु. ३ लाख ६७ हजार ८१कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी आर्थिक आव्हाने मोठी असून ती कशी पेलली जाणार हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी आर्थिक आघाडीवर ‘बचतीचा संकल्प’ करावा लागेल असे वित्तमंत्री त्यांच्या भाषणात शेवटी कबूल करतात, मात्र प्रत्यक्षात सध्याच्या सवंग राजकीय स्थितीत त्यांची अवस्था ‘अग अग म्हशी. . .’ असे म्हणण्यासारखी झाली आहे हे  नाही का?

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result